‘संभाजी भिडेंना असतील तिथून अटक करा’; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी
![Vijay Wadettiwar said that Sambhaji Bhide should be arrested from where he is](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/sambhaji-bhide-and-Vijay-Wadettiwar-780x470.jpg)
मुंबई : शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा फुले आणि साईबाबा यांच्या विषयी वादग्रस्त विधान केलं आहे. भिडे यांच्या या विधनानंतर विरोधी पक्षातील नेते आक्रमक झाले आहेत. संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करावी अशी मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, जे शब्द आम्ही उच्चारू शकत नाही, अशा गलिच्छ शब्दांमध्ये या नालायक माणसाने वक्तव्य केलं आहे. त्यांचे शब्द ऐकले, तर असेल तिथून त्यांना उचलून कोठडीत घालावं ही सरकारकडून अपेक्षा आहे. बहुजनांचा, राष्ट्रध्वजाचा, राष्ट्रपित्याचा अपमान करणं, त्याहीपलीकडे जाऊन जिथे स्वत: या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाले, त्या साईबाबांचा अपमान केला जात आहे. या देशातील करोडो लोकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या साईबाबांचाही अपमान या नालायक माणसानं केलं आहे. यावरूनच या माणसाची लायकी दिसते.
हेही वाचा – राज्य सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ जमिनींवरील २०११ च्या आधीची निवासी अतिक्रमणे नियमित होणार
त्याची जागा कोठडीत आहे. त्याच्यावर कडक कारवाई होण्याची अपेक्षा आहे. या देशातील जनता हे कदापि सहन करणार नाही. स्वत: उपमुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपित्यांचा अपमान सहन करणार नाही अशी भूमिका मांडली होती. आता माझा त्यांना प्रश्न आहे की तुम्ही यांना उचलून कधी जेलमध्ये टाकणार आहात? नाहीतर आम्हाला आमच्या पद्धतीने त्यांचा बंदोबस्त करावा लागेल, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
संभाजी कसला हा? टोपणनाव वापरून मराठी मुलांना भुरळ घालण्याचं काम तो करतोय. त्याचं खरं नाव मनोहर कुलकर्णी आहे. त्याचा बोलविता धनी कोण आहे? तो नेहमीच विष का ओकतोय? जातीय तेढ निर्माण व्हावी, मतांचं विभाजन व्हावं व सत्ताधारी भाजपाला फायदा व्हावा हा त्याचा उद्देश आहे. समाजात, हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करणं, काँग्रेसला डिवचणं, महापुरुष, राष्ट्रपुरुष, महात्म्यांचा अपमान करणं आणि आरएसएसच्या लोकांचं गुणगान करणं हे ते सातत्याने करत आहेत. यांचं मूळ कितीही कुणी नाकारलं, तरी भाजपाला पोषक असंच आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळत आहे. त्यामुळे यांचा बोलविता धनी सत्तापक्ष आहे हे आता सांगायची गरज नाही, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.