छगन भुजबळांच्या ‘त्या’ विधानाचं काँग्रेसकडून समर्थन? विजय वडेट्टीवार म्हणाले..
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ यांनी ब्राह्मण समाजाविषयी एक वादग्रस्त विधान केलं आहे. ब्राह्मण समाजात संभाजी आणि शिवाजी अशी नावे नाहीत, असं छगन भुजबळ म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. दरम्यान, यावरून काँग्रेस नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले, छगन भुजबळ म्हणाले ते खरं आहे, ती वस्तूस्थिती आहे. भुजबळ तिथे राहून वस्तूस्थिती बोलत असतील तर त्यांचं आम्ही स्वागत करतो. आम्ही छगन भुजबळांकडे बहुजनांचे नेते म्हणून बघत होतो. ते या वाक्यावर ठाम राहिले, डगमगले नाही, वक्तव्य मागे घेतलं नाही, शब्द फिरवला नाही तर ते खरे भुजबळ. नाहीतर गेलेले बळ, गेलेला भुजबळ असं होईल.
हेही वाचा – आदित्य ठाकरे आणि शिंदे गटातील मंत्र्याची गुप्त भेट? राजकीय चर्चांना उधाण
चंद्रपूरमध्ये उपचाराअभावी परिचारिकेचा मृत्यू झाला. यावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्यातील आरोग्य विभागातील २६ टक्के पदं रिक्त आहेत. यात तज्ज्ञ, वैद्यकीय महाविद्यालयासाठीचा शिक्षक वर्ग यांचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांचा प्रचंड अभाव आहे. कनिष्ठ डॉक्टरांचाही तुटवडा आहे. मला दुःख हे वाटतं की, चंद्रपूरमध्ये एक नर्स त्या रुग्णालयात राहते. ११ वाजेपर्यंत एकही डॉक्टर त्या रुग्णालयात येत नाही. ती महिला तडफडून मरते. एका परिचारिकेवर अशी वेळ येत असेल, तर इतर रुग्णांची स्थिती काय असेल.
परिचारिकेचा उपचाराअभावी मृत्यू होत असेल, तर आयुष्मान भारत, जागतिक रुग्णालये उभ्या करण्याच्या घोषणा केल्या जातात. लोकांचा जीव वाचवला जाणार नसेल, तर त्याचं काय करायचं. राज्यातील आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजले आहेत, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.
छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
‘ब्राह्मणांमध्ये संभाजी, शिवाजी नावं नाहीत’; छगन भुजबळ यांचे मोठं विधान