Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीमहाराष्ट्रराजकारण

‘वाचन संस्कृती टिकवण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करा’; आमदार निलेश राणे

सावंतवाडी : “बदलत्या काळात ग्रंथालय आणि वाचन संस्कृती जोपासण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेणे काळाची गरज आहे. वाचन संस्कृती अधिक विकसित करण्यासाठी ग्रंथालय कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळीपुढील अडचणी आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे,” अशी ग्वाही आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे दिली.

​उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय (महाराष्ट्र राज्य), जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ येथे आयोजित दोन दिवसीय ‘सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव २०२५’ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कुडाळ येथील श्री महालक्ष्मी हॉलमध्ये या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

​ग्रंथोत्सवोत्सव मिरवणूक रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय येथून काढण्यात आलेल्या भव्य ग्रंथदिंडीने झाली. नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर व सभापती मिलिंद नाईक यांच्या हस्ते दिंडीचे उद्घाटन झाले. या दिंडीत कुडाळ हायस्कूल, प्राथमिक शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, साहित्यिक आणि ग्रंथप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे, उपजिल्हाधिकारी सौ. आरती देसाई, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के, उपसभापती सीताराम तेली, जि.प. सदस्य दीपलक्ष्मी पडते, दीपक नारकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी नगराध्यक्ष विनायक राणे, अरविंद शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा –  ‘उद्योग परवानग्यांमध्ये सुलभतेसोबत महाराष्ट्रात वीजदरातही टप्प्याटप्प्याने घट होणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

​प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांनी ग्रंथालयांच्या समस्या मांडल्या. “ग्रामीण भागात ग्रंथालय चळवळ चालवणे कठीण झाले असून, ग्रंथालयांना हक्काची जागा मिळत नाही. शासनाने प्राथमिक शाळांच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिल्यास ही चळवळ अधिक गतिमान होईल,” अशी मागणी त्यांनी केली. उपजिल्हाधिकारी आरती देसाई आणि जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनीही ग्रंथोत्सवाचे महत्त्व विशद केले.

ग्रंथोत्सवाच्या पहिल्या दिवशी न्यू इंग्लिश स्कूल देवबागच्या विद्यार्थ्यांनी ‘दशावतार’ नाटक सादर करून उपस्थितांची मने जिंकली. दुसऱ्या सत्रात ‘वस्त्रहरण’कार दिवंगत गंगाराम गवाणकर यांच्या साहित्यावर चर्चा करण्यात आली. यामध्ये हेमंत पाटकर, प्रसाद खडपकर, प्रज्ञा चव्हाण आणि सोनाली गोडे यांनी मालवणी साहित्य जागतिक स्तरावर कसे पोहोचले, यावर प्रकाश टाकला. ‘श्रुतिका’ या विषयावरील चर्चेत प्रफुल्ल वालावलकर, डॉ. संजीव आके व सौ. वर्षा वैद्य यांनी सहभाग घेतला.

​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सचिव राजन पांचाळ यांनी केले, तर आभार ॲड. संतोष सावंत यांनी मानले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button