पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्याही बॅगा तपासा; उद्धव ठाकरेंचं आव्हान
![Uddhav Thackeray said that the bags of Prime Minister Modi and Amit Shah should also be checked.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/11/Uddhav-Thackeray-2-780x470.jpg)
मुंबई | कासारशिरशी येथे होणाऱ्या सभेसाठी उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टर औसा येथे उतरले असता निवडणूक आयोगाच्या पथकाने उद्धव ठाकरे यांची बॅग तपासली. मात्र, ठाकरे यांच्या बॅग तपासणीमुळे तो मुद्दा सभेत पुन्हा चर्चेत आला. माझी बॅग तपासली, त्याबद्दल मला काही म्हणायचे नाही. मात्र, सर्वांना समान न्याय हवा. ‘मोदी- शहां’ची पण बॅग तपासली गेली पाहिजे, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, की महायुतीला मत म्हणजे गुजरातला मत, कारण मोदी व अमित शहा महाराष्ट्र लुटून गुजरातला नेत आहेत. त्यामुळे महायुतीच्या विरोधात मत करण्याचे आवाहन ठाकरे यांनी उपस्थितांना केले. महाविकास आघाडी सत्तेत असताना आम्ही कर्जमाफी करून दाखवली. वास्तविक मला दुसऱ्यांदा कर्जमाफी करायची होती. मात्र, तोपर्यंत आमचं सरकार पाडलं. कारण सरकार पाडून महाराष्ट्र लुटून तो गुजरातला न्यायचा होता.
हेही वाचा – सर्वसामान्य माणसांचा विचार करणारा; भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा
महायुतीला निवडून देणे म्हणजे दरोडेखोरांना निवडून देणे, स्वाभिमान गहाण ठेवणे, अदानीच्या लाचार मंडळींना निवडून देणे हे तुम्ही करणार की शिवरायांचे मावळे, स्वाभिमानी सैनिक यांना निवडून देणार, याचा विचार करा महाराष्ट्र पुन्हा घडवायचा असेल तर महाविकास आघाडीलाच निवडून द्या, असे अवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.