‘राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी’; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
![Uddhav Thackeray said that either Fadnavis will remain in politics or I will](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/Uddhav-Thackeray-and-Devendra-Fadnavis-780x470.jpg)
मुंबई | शिवसेना ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील शाखाप्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीला संबोधित करत असताना उद्धव ठाकरेंनी भाजप, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. लोकसभेत आपण असे नडलो की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाम फोडला, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आता विधानसभा निवडणुकीत भाजपाची उरली सुरली गुर्मीही उतरवू, सगळं सहन करून मी उभा राहिलो. यापुढे राजकारणात एकतर ते तरी राहतील किंवा मी राहिल. मला आदित्य ठाकरेला अडचणीत आणण्याचे षडयंत्र कसे रचले गेले होते. हे अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. सगळं सहन करून मी हिंमतीने उभा राहिलो आहे. त्यामुळे राजकारणात एकतर ते तरी राहतील किंवा मी राहीन. आज माझ्याकडे पक्ष चिन्ह, पैसा काहीच नाही. पण शिवसैनिकांच्या हिंमतीवर मी आव्हान देत आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
हेही वाचा – छत्रपती संभाजीनगर येथील प्रकल्पासाठी टोयोटा किर्लोस्करसमवेत सामंजस्य करार
लोकसभा निवडणुकीत असा नडलो की, पंतप्रधान मोदींनाही घाम फोडला. माझी अपेक्षा होती की, मुंबईच्या निवडणुका शेवटच्या टप्प्यापर्यंत लांबवायला पाहीजे होत्या. म्हणजे त्यांच्या अंगावर कपड्याचे जे काही चार-दोन तुकडे उरले होते, तेही उतरविले असते, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबईतील निवडणूक शेवटच्या टप्प्यापर्यंत व्हायला पाहिजे होती. त्यानंतर त्यांचे उरले सुरले कपडेही उतरवले असते. तुम्ही आमदार, खासदार खरेदी केले असतील पण जीवाला जीव देणारे कार्यकर्ते खरेदी करु शकत नाही. बूटचाट्यांनी खुर्चीसाठी आईच्या कुशीवर वार केले, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.