‘बॉम्बस्फोटावेळी दाऊद भाजपा अध्यक्ष होता’; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
![Uddhav Thackeray said that Dawood was the BJP president at the time of the bomb blast](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/uddhav-thackeray-and-devendra-fadnavis-780x470.jpg)
मुंबई : ड्रग्ज प्रकरणातील आरोपी ललित पाटील याला मिळालेल्या राजकीय आश्रयावरून राज्यात राजकारण चांगलच तापलं आहे. ललित पाटील हा शिवसेनेचा पदाधिकारी होता म्हणूनच त्याला तेव्हा सवलत मिळाली का? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवस यांनी उपस्थित केला. दरम्यान, यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिलं आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, ललित पाटील प्रकरणात सत्य काय आहे हे सर्वांना माहिती आहे. देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांवर आमच्या अरविंद सावंत यांनीह उत्तर दिलं आहे. संजय राऊत आणि सुषमा अंधारेही बोलत आहेत. त्यामुळे फडणवीसांकडे प्रश्नांची उत्तरं नाहीत. फडणवीसांच्या म्हणण्यानुसार, अटक केली तेव्हा ललित पाटील शिवसेनेचा नाशिक शहराध्यक्ष होता. मात्र, असं म्हणणं म्हणजे बॉम्बस्फोटाच्यावेळी दाऊद भाजपा अध्यक्ष होता, असं म्हणण्यासारखं आहे.
हेही वाचा – प्रत्येक चित्रपट शुक्रवारीच का प्रदर्शित केला जातो? वाचा यामागचं कारण..
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
ललित पाटीलला अटक झाली १०/११ डिसेंबर २०२० मध्ये. जेव्हा अटक झाली तेव्हा उद्धव ठाकरेंनी ललित पाटीलला नाशिकच्या शिवसेनेचं प्रमुख केलं होतं. आता आश्चर्य बघा की, गुन्हा मोठा होता आणि ललित पाटीलला अटक झाल्यानंतर १४ दिवसांचा पीसीआर (रिमांड) मिळाला. पीसीआर मिळाल्याबरोबर ते ससूनला दाखल झाले. तसेच पूर्ण १४ दिवस पीसीआरमध्ये ससूनमध्ये दाखल होते. यावेळी सरकारी पक्षाकडून न्यायालयात आम्ही आरोपीची चौकशी केली नसल्याचं अथवा त्यांचा आजार योग्य नसल्याचं सांगत अर्जही करण्यात आला नाही.
शेवटी १४ व्या दिवशी ललित पाटीलचा एमसीआर करून टाकण्यात आला. त्यामुळे या गुन्ह्यात आम्ही खोलात जात आहे तेव्हा गुन्हेगाराची चौकशीच झालेली नाही. उद्या यांच्याविरोधात खटला तयार करायचा आहे, तर काय खटला उभा राहणार आहे. चौकशीच केली नाही. आता माझा प्रश्न आहे की, ललित पाटीलची चौकशी का करण्यात आली नाही? याला कोण जबाबदार होतं? तेव्हाचे मुख्यमंत्री जबाबदार होते की, गृहमंत्री जबाबदार होते? त्यावर कुणाचा दबाव होता, कुणाच्या दबावात हे झालं, यात कुणाचे संबंध होते. यात खूप गोष्टी आहेत, मात्र त्या मी आज सांगणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.