‘घोसाळकरांवरील गोळीबार हा ठाकरे गटातील गँगवॉर’; उदय सामंतांचा आरोप
![Uday Samant said that firing on Ghosalkars is a gang war of Thackeray group](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Uday-Samant-780x470.jpg)
Abhishek Ghosalkar Firing | शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची दहीसर येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यावरून राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटावर गंभीर आरोप केला आहे.
मंत्री उदय सामंत म्हणाले की, मॉरिसचा वर्षा बंगल्यावरील फोटो दाखवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाहक बदनामी केली जात आहे. मात्र यापूर्वी मॉरिसला मोठं करण्याचं काम सामना दैनिकाने केले. तसेच मॉरिसच्या सामाजिक कार्याला सामनातून पाठिंबा होता, तर घोसाळकर यांच्या कार्याला मातोश्रीवरून पाठिंबा होता, असं सामंत म्हणाले. तसेच मॉरिसने मागच्या काही काळात केलेल्या सोशल मीडिया पोस्टचाही दाखला दिला.
हेही वाचा – ‘राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी’; संजय राऊतांची मागणी
मॉरिस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटला, यापेक्षा निधन पावलेले माजी नगरसेवक गोळीबारापूर्वी कुणाला भेटले? हा देखील मोठा प्रश्न आहे. याचा तपास झाला पाहिजे. फेसबुक लाईव्हमध्ये मतभेद सोडविण्यासंबंधी त्या दोघांनी चर्चा केली. हे मतभेद सोडविण्यासाठी बैठक कुणी घ्यायची सांगितली? तसेच ते दोघेही आता हयात नाहीत, त्यामुळे त्यांच्या पश्चात आरोप करणे आम्हाला पटत नाही. पण उबाठा गटामुळे ही वेळ आली आहे. त्यांच्या फेसबुक लाईव्हमध्ये ते यापुढे एकत्र काम करायचे आहे, असे का बोलत आहेत? हेदेखील जनतेसमोर आले पाहीजे. घोसाळकर कुटुंबाच्या घरात जी घटना घडली, ती चुकीचीच आहे. त्याचे कुणीही समर्थन करत नाही. मात्र घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांना त्यात ओढण्याचा प्रयत्न होत आहे. ही दुर्दैवी बाब आहे, असं उदय सामंत म्हणाले.
गृहमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी संजय राऊतांनी केली. यावरही उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. ठाकरे सरकार असताना पालघरमध्ये साधूंचे हत्याकांड झाले, तेव्हा का नाही राष्ट्रपती राजवट लावली. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवली, तेव्हा का नाही गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला? तेव्हा कोणतीही कारवाई न करणाऱ्या लोकांना आज राजीनामा मागण्याचा अधिकार नाही, असं उदय सामंत म्हणाले.