बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंना ‘ही’ महिला देणार आव्हान
![Tripti Desai said that history will be made in Baramati if BJP gets the nomination](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/supriya-sule-1-1-780x470.jpg)
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा अनेक नेत्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यासाठी आणखी एका इच्छुकाची भर पडली आहे. भाजपने लोकसभेचं तिकीट द्यावं, मी बारामतीत इतिहास घडवेन, असं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.
तृप्ती देसाई म्हणाल्या की, शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव पुढे येईल असे वाटले होते. मात्र त्या तेथे सक्षम ठरल्या नसल्याचे सांगून त्या बारामती मतदार संघातही सक्षम नसल्याची खोचक टीका भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना केली.
हेही वाचा – इलॉन मस्क ट्वीटरच्या सीईओ पदाचा राजीनामा देणार, महिलेकडे देणार मोठी जबाबदारी
बारामती लोकसभा मतदारसंघातील अनेक भागातून निवडणूक लढवण्यासाठी नागिरिकांकडून सांगितलं जात आहे. अनेकांचे पाठिंबाचेही फोन येत आहेत. त्या अनुषंगानेच मी बारामती लोकसभा मतदारसंघात जनसंपर्क दौऱ्याला सुरूवात करणार आहे. मात्र बारामती जिंकायची असेल तर भारतीय जनता पक्षाने जर मला उमेदवारी दिली, तर मी बारामतीत इतिहास घडवू शकते, असं तृप्ती देसाई म्हणाल्या.
सुप्रिया सुळे खासदार झाल्यानंतर आम्हाला आनंद झाला होता. मात्र गेली पंधरा वर्ष एकच व्यक्ती खासदार म्हणून निवडून जात आहे. शिवाय आमचा घराणेशाहीला विरोध आहे. त्यामुळे मी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवणार असल्याचा मनोदय ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत तरी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना संधी मिळेल असे वाटत होते. मात्र खासदार सुळे याच पुन्हा मतदारसंघात फिरताना दिसतात. इतक्या वर्षांपासून काम करत असणारे कार्यकर्ते-पदाधिकारी केवळ संतरंज्या उचलण्यापुरतेच आहेत काय? असा सवाल तृप्ती देसाई यांनी उपस्थित केला आहे.