To The Point : शिरुरचे खासदार अभिनेता डॉ. अमोल कोल्हे आता मतदार संघात ‘मिस्टर इंडिया’च्या भूमिकेत!
महापरिनिर्वाण दिन, चंपाषष्ठीच्या कार्यक्रमाकडेही पाठ : देव-देश-धर्माभिमान सांगणारे खासदार झाले गायब
![To The Point: Shirur MP, actor Dr. Amol Kolhe, now playing the role of 'Mr. India' in the constituency!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/12/To-The-Point-Shirur-MP-actor-Dr.-Amol-Kolhe-now-playing-the-role-of-Mr.-India-in-the-constituency-780x470.jpg)
पुणे । विशेष प्रतिनिधी
देव-देश अन् धर्माभिमान नाटकांमध्ये सांगणारे अभिनेता खासदार डॉ. अमोल कोल्हे सध्या ‘मिस्टर इंडिया’ च्या भूमिकेत आहेत की काय? असा संतत्प सवाल मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीक्षेत्र जेजुरी येथील खंडोबा… मल्हार मार्तंड देवस्थानमध्ये चंपाषष्टी सोहळा दिमाखात साजरा झाला. मतदार संघात निमगाव, खेड आदी भागात श्री खंडोबा देवाची जागृत मंदिरे आहेत. निमगाव येथील खंडोबाच्या यात्रेनेच राज्यात बैलगाडा शर्यतींना सुरुवात होते. भंडारा-खोबरे उधळून ग्रामीण भागात उत्सव साजरा होतो. ‘‘बैलगाडा शर्यत बंदी उठवल्यानंतर याच निमगावच्या जत्रेत पहिल्यांदा घोडी धरणार..’’ अशी घोषणा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली होती.
श्री खंडोबाचे श्रद्धास्थान जनमाणसामध्ये प्रचंड अढळ आहे, ही बाब खासदार डॉ. कोल्हे यांना माहिती आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आगोदर त्यांनी देव-देश आणि धर्म याचा प्रचारासाठी सोईस्कर वापर केला. किंबहुना, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारीत मालिकेतील अभिनयाचा फायदा त्यांना झाला. निवडणुकांपूर्वी सभा-बैठकांमध्ये चर्चेचा केंद्रबिंदू राहणारे खासदार डॉ. कोल्हे निवडणुकीनंतर आमच्याकडे फिरकलेले नाहीत, अशी खंत शिरुर मतदार संघातील ग्रामीण भागातून व्यक्त होते आहे. त्यामुळे ‘‘ जो झाला नाही देव-देश अन् धर्माचा… तो खासदार आम्हाला काय कामाचा..’’ असा सूर ऐकायला मिळत आहे.
मतदार संघातील या देवस्थानांमध्ये होते चंपाषष्टी..!
वास्तविक, चंपाषष्टीला शिरुर लोकसभा मतदार संघात जेजुरी देवस्थानला जितके महत्व आहेत. तशीच मतदार संघात अनेक जागृत देवस्थान आहेत. खेड तालुक्यातील निमगाव धावडी, आंबेगावमधील थापलिंग, जुन्नरमधील वडजगावचा खंडोबा अशी देवस्थान आहेत. मालिकांमध्ये धर्मवीर संभाजी महाराज यांची भूमिका साकारणारे खासदार डॉ. अमोल कोल्हे चंपाषष्टीला श्री खंडोबाच्या चरणी नतमस्तक झाले नाहीत. त्याची साधी पोस्टही केली नाही. याबाबत शिरुर मतदार संघातील नागरिकांमधून आणि श्री खंडोबा भक्तांमधून व्यक्त होते आहे.
‘संविधान वाचवा’चा नारा… पण, महापरिनिर्वाण दिनाचा विसर..?
दरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई-दादर येथील चैत्यभूमीवर भीमसागर लोटला. चंपाषष्टीला मतदार संघातील एकाही खंडोबा देवस्थानला भेट न देणारे खासदार अमोल कोल्हे मुंबई किंवा दिल्लीत असतील, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर नतमस्तक होतील, असा वाटले होते. मात्र, तसे झाले नाही. पुरोगामी आणि फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र… असा दावा केवळ निवडणुकपुरता होता का? असा प्रश्नही नेटिझन्स विचारत आहेत. तसेच, सोशल मीडियावर कायम सक्रीय असणारे खासदार डॉ. कोल्हे यांनी चंपाषष्टीनिमित्त साधी सोशल मीडिया पोस्टही टाकलेली नाही. याउलट, जुन्याच कार्यक्रमातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वाक्षरीचा टी-शर्ट घालून तयार केलेल्या ‘रिल्स’द्वारे महापरिनिर्वान दिनाचा अभिवादन सोपस्कार पूर्ण केलेला पहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत राजकारणासाठी ‘संविधान वाचवा’ चा नारा देणारे खासदार डाॅ. अमोल कोल्हे याबाबत आत्मचिंतन करणार आहेत का? असा प्रश्न आहे.