श्रावण सुरू होताच भाज्यांचे भाव वधारले; फ्लॉवर, कोबी, गाजर महागले

पुणेः गेल्या आठवड्याच्या तुलनेत मार्केट यार्डातील बाजारात फळभाज्यांची आवक वाढली आहे. मात्र, तुलनेने मागणीही वाढल्याने फ्लॉवर, कोबी, सिमला मिरची आणि गाजर महागले आहे. श्रावण महिना सुरू झाल्याने फळभाज्यांसह पालेभाज्यांना मागणी वाढणार आहे.
मार्केट यार्डात फळभाज्यांची ९० ते १०० ट्रक आवक झाली आहे. कर्नाटक, गुजरातमधून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटकातून पाच ते सहा ट्रक कोबीची आवक झाली. आंध्र प्रदेश, तमिळनाडूतून शेवग्याची तीन ते चार टेम्पोची आवक झाली आहे. इंदूरहून गाजराची आठ ते नऊ टेम्पो; तसेच कर्नाटकातून घेवड्याची तीन ते चार टेम्पोची आवक झाली. बेळगाव, धारवाडमधून मटारची २०० गोण्यांची आवक झाली आहे. स्थानिक भागातून सातारी आल्याची दीड हजार गोण्यांची आवक झाली आहे. भेंडी, गवारची प्रत्येकी पाच ते सहा टेम्पो, फ्लॉवर, तांबडा भोपळ्याची प्रत्येकी आठ ते दहा टेम्पोची आवक झाली आहे. कोबीची चार ते पाच टेम्पो; तसेच सिमला मिरचीची १० ते १२ टेम्पोची आवक झाली आहे. भुईमूगाच्या शेंगांची १०० गोण्या, पारनरेमधून सव्वाशे गोण्या मटारची आवक झाली आहे. कांद्याची स्थानिक भागातून ५० ते ६० ट्रक, आग्रा, इंदूरमधून ४० ते ४५ ट्रक बटाट्याची आणि मध्य प्रदेशातून १५ ते १६ ट्रक लसणाची आवक झाली आहे.
पालेभाज्या तेजीत
मार्केट यार्डातील तरकारी विभागात पालेभाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात कोथिंबिरीसह कांदापातीचे दर वाढले आहेत. कोथिंबिरीच्या एका गड्डीला ३० ते ४० रुपये दर आकारला जात होता. मेथी, कांदापातीला २० रुपये दर मिळाला. गेल्या आठवड्याच्या तुलनेत मेथी आणि शेपूच्या दरांत घट झाली आहे. चाकवत, पुदिना, अंबाडी, मुळे आणि चुक्याचे दर स्थिर आहेत.
उपवासामुळे फळांना मागणी
श्रावण महिन्यात उपवास असल्याने फळबाजारात फळांना मागणी वाढली आहे. पपई, खरबूज, चिकू आणि लिंबाच्या दरांत वाढ झाली आहे. अननस, कलिंगड, डाळिंब, संत्रा, मोसंबी आणि पेरुचे दर स्थिर आहेत. दीड ते दोन हजार गोण्या लिंबू, ५० ते ६० टन डाळिंब, २० ते २५ टेम्पो पपई, १० ते १५ टेम्पो कलिंगड, सुमारे पाच ते सहा टेम्पो खरबूज आणि ५०० ते ६०० क्रेट्स पेरूची आवक झाली.
श्रावणामुळे फुलांना मागणी
फुलबाजारात फुलांची आवक वाढली आहे. श्रावण महिन्यातील सणांमुळे मागणीही चांगली असल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत दर दहा टक्क्यांनी वाढले आहे. दरम्यान, पावसामुळे दहा टक्के मालाला फटका बसला असून, नुकसान झाले आहे.
मासळीच्या मागणी घटली
श्रावणा महिना सुरू असल्याने अनेक जण मांसाहार वर्ज्य करतात. परिणामी, मागणी घटली असून, मासळीच्या दरात घट झाली आहे. गणेश पेठेतील मासळी बाजारात आवकही घटली आहे. मागणी कमी असल्याने दरामध्येही घसरण झाली आहे. खोल समुद्रातील मासळीची चार ते पाच टन, खाडीच्या मासळीची ५० ते १०० किलो, नदीतील मासळीची १०० ते २०० किलो इतकी आवक झाली आहे.