To The Point : महापालिका विविध समिती नियुक्तींमध्ये आमदार लांडगे यांचे ‘‘सोशल इंजिनिअरिंग’’
नवे-जुने अन् सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न : समर्थकांना समान संधी देण्याची राजकीय प्रगल्भता
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी । पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणाचा केंद्रबिंदू किंबहुना सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे नेते आमदारम महेश लांडगे यांनी पुन्हा एकदा राजकीय प्रगल्भतेचे उदाहरण नवोदितांसमोर ठेवले आहे. महापालिका स्थायी समितीसह विविध समितींच्या सदस्यांची नियुक्ती दि. 20 फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत निश्चित करण्यात आली. यामध्ये जुन्या-नव्यांचा समावेश आणि ‘सोशल इंजिनिअरिंग’सुद्धा पहायला मिळाले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक भारतीय जनता पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशी चुरशीची झाली. या निवडणुकीत भाजपाने 128 पैकी 84 इतक्या सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने 37 जागा घेत विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारली आहे. शिवसेना शिंदे गटाला 5 तर इतर 1 असे संख्या बलाबल आहे.
महापालिका निवडणुकीत आमदार लांडगे यांनी गावकी-भावकी एक ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याला यश मिळाले. त्यामुळे भाजपातून बाहेर पडलेले रवि लांडगे यांचा भाजपा घरवापसीचा मार्ग सुकर झाला. एव्हढेच नव्हे, तर महापालिकेत सत्ता स्थापन केल्यानंतर महापौरपदी कोणाची वर्णी लागणार? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष होते. या पदासाठी भोसरीतून रवि लांडगे, चिंचवडमधून शत्रुघ्न काटे यांच्या नावाची चर्चा सर्वाधिक होती.
प्रदेश पातळीवर पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौरपदासाठी रवि लांडगे यांच्या नावाची सूचना केली. त्याला आमदार लांडगे विरोध करतील, असे बोलले जात होते. मात्र, लांडगे यांनी रवि लांडगेच्या महापौरपदाबाबत पक्षाच्या निर्णयाचे स्वागत केले. किंबहुना, रवि लांडगे यांनी पदावर विराजमान झाल्यापासून ‘‘आमदार लांडगे मोठ्या भावासारखे पाठिशी राहीले..’’ याचा सातत्त्याने उल्लेख करताना पहायला मिळते.
दरम्यान, महापालिका स्वीकृत नगरसेवक आणि स्थायी समितीसह अन्य समितींवर कोणाला संधी मिळणार? याबाबत शहराच्या राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता होती. या समितींवर संधी देताना आमदार लांडगे यांनी ‘‘सोशल इंजिनिअरिंग’’ अगदी प्रगल्भपणे ठेवल्याचे पहायला मिळते.
‘‘एकला चालो रे’’ वाल्यांना दणका…
भोसरी विधानसभा मतदार संघात एकूण 12 प्रभाग येतात. यामध्ये 1 ते 9 आणि 11 ते 13 या प्रभागांचा समावेश आहे. या निवडणुकीत प्रभागातील चारही उमेदवारांचा प्रचार करावा. कोणीही एकासाठी मत द्या… अशी भूमिका घेवून नये, अशा सूचना प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी जाहीर सभेत दिल्या होत्या. त्यामुळे ज्या प्रभागात ‘‘मला एक मत द्या..’’ असे चित्र दिसते. त्या ठिकाणी कोणत्याही सदस्याला महत्त्वाच्या पदावर संधी देण्यात आलेली नाही. प्रभागात मिळालेली मते आणि संबंधित नगरसेवकाची कामगिरी याचा विचार करुन समिती सदस्यांची नावे निश्चित केली आहेत. विशेष म्हणजे, ज्यांना संधी दिली आहे. त्यामध्ये बहुतेक नगरसेवक नव्याने निवडून आलेले आहेत. याचा अर्थ ज्या अनुभवी किंवा पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेवकांना संधी मिळालेली नाही. त्यांना महापौर, उपमहापौर आणि महत्त्वाच्या पदांवर दुसऱ्या टप्प्यात संधी मिळणार, हे निश्चित झालेले आहे.
‘‘सोशल इंजिनिअरिंगवर’’ भर…
स्थायी समितीमध्ये आमदार महेश लांडगे यांच्या भोसरी विधानसभा मतदार संघात सारिका गायकवाड (SC), योगिता नागरगोजे (वंजारी), शीतल वर्णीकर (OBC) कृष्णा सुरकुले (SC- माजी सैनिक) आणि अर्चना कारंडे (मराठा) यांचा समावेश आहे. तसेच, विधी समितीमध्ये सुजाता बोराटे (OBC), श्रुती डोळस (SC) यांना संधी दिली आहे. शहर सुधारणा समितीमध्ये सुहास कांबळे (SC- प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ) आणि प्रा. उत्तमराव केंदळे (मराठा) यानंतर शिक्षण समितीचा विचार केला असता, कविता भोंगाळे (मराठा), रीटा सानप (वंजारी) आणि सारिका बोऱ्हाडे (OBC) यांचा समावेश आहे. महिला व बालकल्याण समितीमध्ये शिवानी नरळे (लोणारी), राणी पठारे (मराठा) यांचा समावेश आहे. यासह क्रीडा व सांस्कृतिक समितीमध्ये उदय गायकवाड (मराठा) आणि योगेश लांडगे (मराठा) अशा नगरसेवकांना संधी मिळाली आहे. भोसरी विधानसभा मतदार संघाचा विचार करता महेश लांडगे यांनी आपल्या समर्थकांना नव्या व जुन्यांचा मेळ आणि सोशल इंजिनिअरिंगवर भर दिल्याचे अधोरेखित होत आहे.







