Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

To The Point:‘‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ चा खर्च वाढला..’’ असा गळा काढणाऱ्यांना विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांनी अप्रत्यक्ष आरसा दाखवला!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामाची स्व. राम सुतार यांच्या कार्यशाळेत केली पाहणी

पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वांत उंच पुतळा अर्थात ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’’ उभारण्याचे काम सुरू आहे. बोऱ्हाडेवाडी-मोशी येथील ही शंभूसृष्टी शिव-शंभू प्रेमींच्या आस्थेचा आणि अस्मितेचा विषय ठरली आहे. मात्र, या शिव-शंभू कार्यात विघ्नसंतोषीपणा करण्याचा प्रयत्न अगदी विधानसभा निवडणुकीपासून सुरू आहे. पुतळ्याच्या कामाला खर्च जास्तीचा झाला म्हणून, महापालिका सर्वसाधारण सभेत गळा काढणाऱ्या मान्यवरांना आता थेट विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांनी अक्षरश: आरसा दाखवला आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक इंदू मिल, मुंबई येथे सुरू आहे. या ठिकाणी आंबेडकरांचा ब्राँझ धातुचा पुतळा उभारण्यात येत आहे. त्याचे काम जगप्रसिद्ध शिल्पकार स्व. राम सुतार यांच्या गाझीयाबाद येथील कार्यशाळेत सुरू आहे. सुतार यांच्यानंतर ही कार्यशाळा त्यांचा मुलगा शिल्पकार अनिल सुतार चालवतात. त्यांचेकडेच पुतळ्याचे काम सुरू आहे. या पुतळ्याची पाहणी राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांनी केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा      :              मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन 

आण्णा बनसोडे म्हणाले की, पुतळ्याचे काम ३५-४० टक्के पूर्ण झाले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा पुतळा आहे. काम सुरू झाले त्यावेळी ब्राँझची किंमत ८५० रुपये इतकी होती. त्यामध्ये वाढ होवून ती १७०० रुपयांपर्यंत गेली आहे. कारागिरांचे पगार वाढले आहेत. कामासाठी लागणारा कच्चा माल आणि पुरवठा यावर अमेरिका-इस्त्राईल- इराण युद्धाचाही परिणाम झाला आहे. त्यामुळे दरांमध्ये तफावत झाली असून, टेंडर कॉस्टपेक्षा जास्तीचा खर्च होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पाठपुरावा करुन निधी उभा केला जाईल. याद्वारे दरांमधील तफावत आणि वाढीव खर्चाच्या मुद्याला बनसोडे यांनी तांत्रिकदृष्टया समर्पक उत्तर दिले. ते पिंपरी-चिंचवडमधील ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ला सुद्धा लागू होते.

किंबहुना, ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ चे कामसुद्धा स्व. राम सुतार यांच्या कार्यशाळेत पूर्ण करण्यात आले. पुतळ्याचे पार्ट मोशीत आणण्यात आले. त्याची जोडणी आणि फ्रॅब्रिकेशनचे काम पूर्ण करण्यापूर्वीच त्याच्या गुणवत्तेवर विधानसभा निवडणूक काळात प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. केवळ राजकीय उद्देशाने महापालिका निवडणुकीतसुद्धा तसा प्रयत्न झाला. त्याची री- पुन्हा महापालिका सभेतही ओढण्यात आली. या सर्व प्रकारात राष्ट्रवादीचे नगरसेवक संदीप वाघेरे, शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा उबाळे आघाडीवर होत्या. पुतळ्याच्या कामासाठी ५० कोटी रुपयांची स्थापत्य आणि विद्युत विषयक कामांसाठी ‘‘ॲट पार’’ म्हणजे टेंडर कॉस्ट एवढ्या रकमेची निविदा मंजूर करण्यावरुन स्थायी समिती आणि मुख्य सभेत अनेक आक्षेप नोंदवण्यात आले. पण, इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे काम आणि मोशीतील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे काम एकाच कार्यशाळेत झालेले आहे. त्यांच्या नियंत्रणात काम सुरू आहे. मग, महाराजांच्या पुतळ्यावर होणाऱ्या खर्चावर आक्षेप घेतला जातो. त्यामागे राजकीय हेतू साध्य करण्याचा प्रयत्न आहे, हे स्पष्ट होते.

पिंपरी-चिंचवडकरांची अपेक्षा…

महामानवांची पुतळे आणि स्मारके यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण होवू नये. स्मारकाचे काम गुणात्मक दर्जाचा विचार करुन झाले पाहिजे. १०० वर्षांपेक्षा जास्तकाळ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’’ टिकला पाहिजे. त्या अनुशंगाने पुतळ्याचे काम व्हावे. पिंपरी-चिंचवड शहराला जगात कोण ओळखतं? असा प्रश्न विचारल्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यावर टीकेची झोड उठली. मग, शहराची ओळख जगभरात व्हावी, असे प्रकल्प, स्मारक होत आहेत. त्याबद्दल निराधार टीका-टीपण्णी करुन राजकीय स्वार्थ साधणाऱ्यांना जाब कोण विचारणार? हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे शहराची ओळख असलेल्या कामांवर बोलताना मान्यवर लोकप्रतिनिधींनी भान ठेवावे, अशी माफक अपेक्षा सर्वसामान्य पिंपरी-चिंचवडकरांकडून व्यक्त होत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button