Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारणलोकसंवाद - संपादकीय

To The Point : पिंपरी-चिंचवडमध्ये अजितदादांचे मीठ आळणीच..!

‘‘लाखोंचा आधार गेला...’’ पण, शोकसभेत ‘‘स्वत: पराभवाचे रडगाणे’’ : नेते म्हणवणारे स्थानिक मान्यवर पदाधिकारी काहीही बोलले नाही!

पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री लोकनेते अजितदादा पवार यांचे अपघाती निधन झाले. संपूर्ण महाराष्ट्रातून याबाबत हळहळ व्यक्त होत आहे. ठिकठिकाणी शोकसभा होत आहेत. अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वपक्षीय शोकसभेत ‘‘स्वत:च्या पराभवाचे रडगाणे’’ पहायला मिळाले. राजकारणात सुसंस्कृतपणाचे ढोंग करणाऱ्या मंडळींनी शोकसभेचा मंचसुद्धा सोडला नाही.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी पिंपरी-चिंचवडमधील सर्वपक्षीय शोकसभा प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित केली. त्या शोकसभेला सर्व नेते, पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर हजर राहिले. आपआपल्या आठवणी सांगून त्यांनी अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली.

याच शोकसभेत नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या एका उमेदवाराने आपल्या पराभवाचे रडगाणे सुरू केले. ही शोकसभा आहे याचे भान त्यांना राहिले नाही. त्यांनी थेट आमदार महेश लांडगे यांच्यावर तोंडसुख घ्यायला सुरूवात केली. निवेदक प्रत्येक मान्यवराचे मनोगत झाले की, ‘‘दोन मिनिटांत आपण श्रद्धांजली वाहावी..’’ असे आवाहन करीत होते. मात्र, काही मंडळींना ही राजकीय सभा असल्याप्रमाणे शोकसभा गाजवायची होती. तशी तयारीच करुन काहीजण भाषणाला उभे राहिले.

निवडणुकीत झालेल्या पराभवाचा आणि आरोप-प्रत्यारोपांचा शोकसभेत काय संबंध..? असा खरा प्रश्न आहे. कितीही वैर असले, तरी मृत्यूनंतर वैर संपते.. असे म्हटले जाते. पिंपरी-चिंचवडमध्ये अजितदादांच्या मृत्यूनंतर स्वत:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी… आणि ‘‘पॉलिटिकल स्पेस’’ निर्माण करण्यासाठी सुरू असलेला आटापीटा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. त्याचे सोशल मीडियावर पडसाद पहायला मिळत आहेत. अक्षरश: नाचक्की सुरू आहे. खरंतर… ही शोकसभा होती की, पराभूत मानसिकतेची ‘‘ट्रेस टेस्ट’’ अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

दिवंगत अजितदादा पवार नेहमी म्हणायचे ‘‘काय… माझे मीठच आळणी..! कुणाचं चांगलं करायला गेलो… की तोच माझ्याविरोधात वागतो.’’ निवडणूक काळात जे झालं ते झालं… गंगेला मिळालं..’’ असा स्वभाव अजितदादांचा होता. त्यांनी कितीही राजकीय स्पर्धक असला, तरी त्याचा द्वेष कधीही केला नाही.

किंबहुना, ‘‘महेश आपलाच आहे रे..’’ असे अजितदादा खासगीत बोलत होते. याचे आम्ही प्रत्यक्ष साक्षीदार आहोत. पण, महानगरपालिका निवडणुकीत झालेल्या पराभवाचे खापर कुणावर फोडण्याची ‘स्पेस’ मिळत नव्हती. ती शोकसभेच्या माध्यमातून मिळाली. 2017 मध्ये राष्ट्रवादीला महापालिकेतील सत्ता गमवावी लागली. त्यावेळी भारतीय जनता पार्टीत असलेली मंडळी राष्ट्रवादीवर आणि अजितदादांच्या कारभारावर काय भाषेत टिका करीत होती? हे अद्याप पिंपरी-चिंचवडकरच काय अजितदादांचे समर्थकसुद्धा विसरलेले नाही.

‘‘2017 प्रचंड टिका-टिपण्णी करणे… भाजपाकडून महत्त्वाच्या पदांचा लाभ मिळवणे. त्यानंतर 2019 आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मी भाजपात आहे… असा दावा करीत पक्षविरोधी कारवाया करणे… असे महापाप करणाऱ्या मंडळीने ‘‘अजितदादांनी मला संधी दिली… त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी एकतरी पक्ष मिळाला..’’ अशी कृतज्ञता शोकसभेत व्यक्त करणे अपेक्षीत होते. पण, ‘‘मी वाघीण.. मी लढणार.. मी हारलेली नाही…’’ असा पोरकटपणा करुन सोशल मीडियावर ‘लाईक्स’ आणि ‘कमेंट’ मिळवण्यासाठी ‘स्टंटबाजी’ करण्याचा प्रयत्न झाला. यावर राष्ट्रवादीचे म्हणवणारे एकही मान्यवर बोलले नाही किंवा संबंधितांना असे ‘बेसलेस’ बोलताना अटकाव करण्याचे धाडस त्यांनी दाखवले नाही. शहराध्यक्ष योगेश बहल असो किंवा माजी आमदार विलास लांडे यांनी दोघांनीही सुरू असलेला हा प्रकार थांबवला नाही. अजितदादांना अभिप्रेत होते की, पक्षाची भूमिका मांडण्यासाठी प्रभावीपणे स्थानिक नेत्यांनी पुढे यावे. त्यांच्या शोकसभेत उधळली जाणारी ‘‘राजकीय मुक्ताफळे’’ रोखण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. मरणानंतरही अजितदादांचे मीठ आळणींच निघाले, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

श्रद्धांजलीच्या आडून भविष्यातील राजकीय तडजोडींचे संदेश…

अजितदादांच्या शोकसभेत काही मान्यवरांनी श्रद्धांजलीच्या आडून भविष्यात राजकीय तडजोडींचे संदेश दिले. ‘‘विरोधकांना स्पेस मिळाली पाहिजे..’’ अशी मागणी केली. वास्तविक, शोकसभेत विरोधकांना स्पेस कशासाठी हवी होती. याचा उलघडा होणे अपेक्षीत आहे. ‘अजित सृष्टी’ उभारण्याबाबत महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला. त्यावरुनही राजकारण सुरू झाले. हे कशासाठी? याचाही विचार झाला पाहिजे. महापालिका निवडणूक झाली. काहींचा पराभव झाला. पण, कोणत्याही परिस्थितीमध्ये सभागृहात जायचे आहे… अशी अटकळ काहींनी बांधली आहे. त्या माध्यमातून मी भाजपाला विरोध करु शकतो… असा असा संदेश राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींकडे पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी शोकसभा हा मंच राजकीय उद्देशाने वापरण्यात आला.

राजकीय व सामाजिक जीवनात काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याने निवडणुकीत झालेले आरोप-प्रत्यारोप विसरून पुन्हा लोकांच्या हितासाठी काम करावे, अशी शिकवण अजितदादांची आहे. त्यांनी कधीही भावनिक राजकारण केले नाही. शोकसभेत दादांच्या आठवणींना उजाळा देणे अपेक्षीत होते. राजकीय ‘स्टंटबाजी’ करणे हा राष्ट्रवादीचा संस्कार नाही. दु:खद प्रसंगाचे राजकारण करणे अनूचित आहे.
– सुलक्षणा शिलवंत-धर. मा. नगरसेविका, राष्ट्रवादी.

 

राजकीय विरोधक असतानाही अजितदादांच्या निधनानंतर ‘अजित सृष्टी’ उभारण्याबाबत महेशदादा लांडगे यांनी दाखवलेली ही माणुसकी आजच्या राजकारणात दुर्मीळ आहे. राजकीय मतभेदांपलीकडे जाऊन माफी मागण्याचे धैर्य ही मोठी संस्कारांची निशाणी आहे. हा प्रसंग महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेची आठवण करून देणारा ठरला. नेतृत्व म्हणजे केवळ सत्ता नव्हे, तर संवेदनशीलता हे त्यांनी कृतीतून दाखवले. अशा उदाहरणांमुळेच राजकारणाबद्दलचा विश्वास पुन्हा दृढ होतो.
– डॉ. बाबा कांबळे, कामगार नेते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button