To The Point: भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे महापालिका निवडणुकीत ठरले ‘‘गेम चेंजर’’
प्रभाग 28 मध्ये राष्ट्रवादीला रोखले : ‘‘फेक नॅरेटिव्ह’’ दिले प्रत्यक्ष ‘‘रिझल्ट’’मधून उत्तर!
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी । पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी राजकीय दृष्ट्या महत्त्वाची आणि आव्हानात्मक अशी दुहेरी भूमिका यशस्वीरीत्या पार पाडली आहे. स्वतःचा बालेकिल्ला असलेल्या प्रभागातून भाजपाच्या तिकीटावर स्वत:सह आणखी दोन उमेदवार बहुमताने निवडून आणले आहेत. प्रभाग क्रमांक 28 अर्थात पिंपळे सौदागर- रहाटणी भागातून अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत भाजपाच्या तीन जागा जिंकल्याचे श्रेय शत्रुघ्न काटे यांना जाते. तसेच, शहराच्या 32 प्रभागांमध्ये शहराध्यक्षपदाची जबाबदारीसुद्धा त्यांनी समर्थपणे सांभाळली आहे.
वास्तविक, पूर्वी शहरात दोन सदस्य प्रभाग पद्धती होती. सुमारे 25 वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शहरात मोठा पगडा होता. त्यातच पिंपळे सौदागरमध्ये राष्ट्रवादीचे नेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांचे ‘होम पीच’ म्हणून वर्चस्व कायम होते. या प्रभागातून 2017 च्या निवडणुकीत नाना काटे आणि त्यांच्या सौभाग्यवती शीतल काटे दोघेजण निवडून आले होते. राष्ट्रवादीचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाना काटे यांना विरोधी पक्षनेतेपद दिले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीचा उमेदवार म्हणून काटे चिंचवड विधानसभा क्षेत्रात प्रभावीपणे काम करीत होते. त्यामुळे प्रभाग क्रमांक 28 ची निवडणूक अत्यंत लक्षवेधी होणार, हे निश्चित होते.
दरम्यान, महानगरपालिका निवडणुकीची घोषणा झाली. राष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांच्यावर पक्षाने निवडणूक प्रचार प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे याच प्रभागातून भाजपाचे नगरसेवक म्हणून प्रतिनिधीत्व करणारे आणि विद्यमान शहराध्यक्ष शत्रुध्न काटे यांच्याच ‘काँटे की टक्कर’ होणार यावर शिक्कामोर्तब झाले होते.
वास्तविक, भारतीय जनता पार्टीच्या सत्ताकाळात शत्रुघ्न काटे यांना कोणतेही महत्त्वाचे पद मिळाले नाही. यावेळी ते निवडून आल्यास महत्त्वाचे पदावर दावा करतील किंवा विधानसभा निवडणुकीत स्पर्धक म्हणून समोर येतील, या अस्वस्थतेतून पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरील प्रतिस्पर्धींनी शत्रुघ्न काटे यांना कायम छुपा विरोध केला आहे. त्याच अस्वस्थतेतून ’’प्रभाग 28 मध्ये नाना काटे यांच्यासोबत ‘‘सेटिंग करणार आहेत..’’ असा ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरवण्यात आला. पक्षश्रेष्ठींपर्यंत सोयीस्कर ‘मॅसेज’ पोहोचवण्यात आला. त्याची परिणीती प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आकुर्डीतील सभेत पहायला मिळाली. राजकीय उद्देशाने राबवलेले षडयंत्र शत्रुघ्न काटे यांनी कृतीतून उधळून लावले. प्रभागातील 4 पैकी 3 जागा बहुमताने जिंकल्या आणि शहरातील भाजपाच्या विजयाचा कळस रचला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकालानंतर त्यांना फोन करुन अभिनंदन केले.
…. अशी झाली प्रभाग 28 मध्ये लढत!
राष्ट्रवादीचे नेते नाना काटे आणि त्यांच्या सौभाग्यवती शीतल काटे दोघेही निवडणुकीच्या रिंगणात होते. भाजपाकडून शत्रुघ्न काटे, अनिता काटे, कुंदा भिसे आणि संदेश काटे यांनी निवडणूक लढवली. राष्ट्रवादीकडून नाना काटे, शीतल काटे, उमेश काटे आणि मिनाक्षी काटे असे उमेदवार होते. भाजपाचे पॅनेलप्रमुख म्हणून शत्रुघ्न काटे यांनी 17 हजार 589 मते मिळवत विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादीचे पॅनेलप्रमुख म्हणून 17 हजार 261 मते मिळाली आहेत. या निवडणुकीत नाना काटे यांच्या सौभाग्यवती शीतल काटे यांचा पराभव झाला आहे. नाना काटे यांची वैयक्तिक ताकद आणि स्थानिक प्रभाव असूनही भाजपाने या प्रभागात ४ पैकी ३ जागांवर विजय मिळवत आपला दबदबा कायम राखला. हा विजय केवळ स्थानिक राजकारणापुरता मर्यादित नसून, शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वक्षमतेवर शिक्कामोर्तब करणारा ठरला आहे.
शत्रुघ्न काटे यांचे निर्णाय नेतृत्व…
शहराध्यक्ष या नात्याने संपूर्ण पिंपरी-चिंचवडमध्ये उमेदवारांची निवड, प्रचाराची दिशा, कार्यकर्त्यांचे समन्वय आणि बूथस्तरीय नियोजन यावर काटे यांनी लक्ष केंद्रीत केले. त्याच वेळी, स्वतःच्या प्रभागातील निवडणूकही तेवढ्याच ताकदीने लढवत ‘गड जिंकणे आणि शहर सांभाळणे’ ही दुहेरी जबाबदारी यशस्वी केली. शत्रुघ्न काटे यांनी प्रभागात प्रचंड वातावरण निर्माण केले. त्यामुळे नाना काटे यांना प्रभागात लक्ष केंद्रीत करावे लागले. त्याचा फायदा चिंचवड मतदार संघासह पिंपरी आणि भोसरीतसुद्धा भाजपाला झाला आहे. या निकालामुळे भाजपात नवचैतन्य निर्माण झाले असून, शत्रुघ्न काटे हे केवळ संघटनात्मक नेते नव्हे तर निवडणूक रणनितीमध्येही प्रभावी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आगामी राजकीय वाटचालीसाठी हा विजय भाजपासाठीच नव्हे, तर शत्रुघ्न काटे यांच्यासाठीही निर्णायक ठरणारा मानला जात आहे.




