न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, थेरगाव येथे ७७वा प्रजासत्ताक दिन उत्साहात
शिक्षण विश्व : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ, देशभक्तीचा जागर

पिंपरी चिंचवड | न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, थेरगाव येथे देशाच्या ७७व्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी संचनालय करून प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व आमंत्रण दिले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष विजय पवार, उपाध्यक्ष निलेश पलगमल, सचिव अशोक मोरे, खजिनदार सुरेखा पवार, तसेच संस्थेचे पदाधिकारी विलास शेलार, विनायक पवार, संध्या पवार, शशिकांत इंगवले, महादेव जमादार उपस्थित होते. यासह थेरगावमधील नवनिर्वाचित नगरसेवक तानाजी बारणे व मनिषा पवार हेही मान्यवर म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.
यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक उपक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. काही विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणे केली, सामूहिक गीत गायन झाले, तर देशभक्तीपर नृत्यांनी कार्यक्रमात रंग भरला. डंबेल्स, घुंगरू काठी, रिंग, लेझीम अशा विविध कवायत प्रकारांचे सादरीकरण विशेष आकर्षण ठरले. पालकवर्गानेही विद्यार्थ्यांच्या या उपक्रमांना उत्स्फूर्त दाद दिली.
हेही वाचा : दिल्लीच्या कर्तव्यपथावर महाराष्ट्राचा डंका, ‘गणेशोत्सवा’चा चित्ररथ ठरला सर्वोत्कृष्ठ

चालू शैक्षणिक वर्षात शाळेतील विद्यार्थ्यांनी शालेय खेळ तसेच फेडरेशन स्तरावर किक बॉक्सिंग, युनिफाईट व एल्बो बॉक्सिंग स्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना लाडू वाटप करण्यात आले. हा संपूर्ण कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या नाईक मॅडम व अग्निस नायगम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाच्या यशाबद्दल संस्थेच्या सर्व प्राधिकाऱ्यांनी सहभागी सर्वांचे अभिनंदन केले.
“प्रजासत्ताक दिन हा केवळ उत्सव नसून आपल्या संविधानातील मूल्यांची जाणीव करून देणारा दिवस आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच संस्कार, शिस्त आणि देशप्रेम आत्मसात करून जबाबदार नागरिक घडावे, हीच अपेक्षा आहे. न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेले उपक्रम प्रेरणादायी आहेत.”
– विजय पवार, अध्यक्ष, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, थेरगाव.




