संजय राऊतांच्या ‘भारत जोडो’ यात्रेतील सहभागावरून भाजपचा टोला
![The more steps Sanjay Raut takes with Rahul Gandhi, the more the doors of Uddhavji's Shiv Sena's victory in Maharashtra will be closed, said Ashish Shelar.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/ashish-shelar-and-sanjay-raut--780x470.jpg)
देव, देश आणि धर्माच्या संघर्षातून गायब असलेले राऊत, काँग्रेसच्या युवराजांसोबत चालायला गेले!
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत सहभागी झाले. जम्मू-काश्मिरमध्ये संजय राऊत यांनी भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी टोला लगावला आहे.
संजय राऊत राहुल गांधींसोबत जितकी पाऊले चालतील, तितके महाराष्ट्रामध्ये उद्धवजींच्या शिवसेनेचे विजयाची दारे बंद होतील. जे राहुल गांधींच्या हातात हात घालून चालणारे संजय राऊत उद्धव शिवसेनेला आणखी कमकुवत करत आहेत, म्हणून त्यांना आमच्या शुभेच्छा, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.
स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र सन्मानपूर्वक विधानभवनात लावण्यात येणार आहे. हा एक अराजकीय कार्यक्रम असल्याने कोणताही आक्षेप न घेता या कार्यक्रमात सहभागी व्हावे, हीच आमची भावना आहे, असंही आशिष शेलार म्हणाले.
सोबतच, देव, देश आणि धर्माच्या संघर्षातून गायब असलेले खासदार संजय राऊत, काँग्रेसच्या युवराजांसोबत चालायला गेले! याच संगतीमुळे सरकार गेले, खासदार, आमदार गेले, पक्षाची शकले उडाली, याच भल्या कामाचा झेंडा तुम्ही घेऊन निघालाच आहात, तर तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची! असं आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.