Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘सर्वांच्या सहभागातून प्रगतीची वाटचाल’; पालकमंत्री संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राला प्रगतीची परंपरा आहे. ही संतांची भुमि आहे. आपला जिल्हा हा गुंतवणूकदारांसाठी नेहमीच पहिली पसंती ठरला असुन जिल्ह्याची औद्योगिक वाढ लक्षणीय आहे. रोजगाराच्या अनेक संधी याठिकाणी निर्माण होत आहेत. सर्व घटकांच्या सहभागामुळे ही प्रगतीची वाटचाल होत आहे, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन आज उत्साहात साजरा झाला. देवगिरी या पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय सोहळा पार पडला. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहण करण्यात आले.

जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मनपा आयुक्त अमोल येडगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्रचे विशेष महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, नगरसेवक हर्षदा शिरसाट, किशोर नागरे तसेच अन्य अधिकारी, माजी खासदार चंद्रकांत खैरे तसेच स्वातंत्र्य सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन राष्ट्रगीत झाले. राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पोलीस वाद्यवृंदाच्या तालावर शानदार संचलनाने उपस्थितांची मने जिंकली. पालकमंत्री शिरसाट यांनी परेडचे निरीक्षण केले. झालेल्या संचलनात होमगार्ड, बँड पथक, शहर वाहतूक शाखा ,महाराष्ट्र सुरक्षा बल, पोलीस आयुक्तालय आणि छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकांनी सहभाग घेतला.

हेही वाचा –  शासकीय सुट्टीच्या दिवशी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची वायसीएम रुग्णालयाला अचानक भेट

पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, आपला जिल्हा हा गुंतवणूकदारांची प्रथम पसंती ठरत आहे. जिल्ह्यात होत असलेल्या औद्योगिक विकासात कामगार वर्गाचे मोठे योगदान आहे. जिल्ह्यातील आरोग्य सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, नागरी सुविधांचा विकास करण्यासाठी होत असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी आपल्या भाषणातून दिली.

ते म्हणाले की, जिल्ह्यात विविध प्रशासकिय सुधारणांमुळे प्रलंबितता कमी होऊन सामान्य नागरिकांना सेवा देण्यातही आपला जिल्हा अग्रेसर ठरला आहे, त्याबद्दल पालकमंत्री शिरसाट यांनी प्रशासकीय यंत्रणेचे अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, समाजातील सर्व घटकांच्या सहयोगातून आपल्याला जिल्ह्याचा विकास करावयाचा आहे. राज्याचा प्रगतीचा वारसा पुढे न्यायचा आहे, त्यासाठी सगळ्यांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. सर्वांच्या हिताच्या योजनांच्या अंमलबजावण्यासाठी निधी उपलब्ध केल जात आहे, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. आपण सर्वजण यात योगदान देऊ; जिल्ह्याचे नाव प्रगतीपथावर नेऊ, असा संकल्प आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सर्व मिळून करू, असे आवाहन पालकमंत्री शिरसाट यांनी केले.

देशात जनगणना सुरु होत आहे. त्याचा पहिला टप्पा आजपासून (दि.१ मे) स्वगणना सुरु होत आहे. त्यासाठी नागरिकांनी ऑनलाईन आपली माहिती भरावी. जनगणनेत माहिती द्यावी. ही माहिती गोपनीय असते. या माहितीचा उपयोग करुन देशाच्या, राज्याच्या कल्याणाच्या योजना, धोरणे आखली जातात. जनगणनेत सहभाग नोंदवावा. आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकाला माहिती द्या, असे आवाहन यावेळी पालकमंत्री शिरसाट यांनी केले.

याप्रसंगी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तिंचा सन्मान पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आला. त्यात १५० दिवसाच्या कृती आराखड्या अंतर्गत सेवाकर्मी प्लस कार्यक्रमात जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरने प्रथम क्रमांक मिळविला त्याबद्दल जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राघवेंद्र घोरपडे, महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल अश्विनी लखमले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त कविता वाघ यांना सन्मानीत करण्यात आले. उत्कृष्ट कामगीरीबद्द्ल पोलीस उपनिरीक्षक श्रीमती प्रविणा यादव, सहाय्यक पोलीस आयुक्त आनंद गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद अविनाश बागुल, दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस हवालदार ओमप्रकाश बनकर आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस हवालदार दीपक इंगळे व देवीसिंग ठाकूर यांना सन्मानित करण्यात आले.

सोहळा संपन्न झाल्यावर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी कार्यक्रमास उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, पदाधिकारी, नागरिक, अधिकारी यांना भेटून शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन प्रवीण कन्नडकर यांनी केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button