Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘शालेय अभ्यासक्रमात श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाच्या इतिहासाचा समावेश करणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी धर्म व संस्कृतीच्या रक्षणासाठी दिलेली शहादत ही जगाच्या इतिहासातील अद्वितीय घटना आहे. त्यांच्या बलिदानाची गाथा केवळ एका कार्यक्रमापुरती मर्यादित न राहता ती पुढील पिढीपर्यंत पोहचली जावी. यासाठी शालेय अभ्यासक्रमात श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाच्या इतिहासाचा समावेश केला जाणार आहे. तसेच नवी मुंबई परिसरात त्यांच्या नावाने रुग्णालय उभारण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अल्पसंख्याक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समिती यांच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत खारघर येथे ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शीख समाजाचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी भारतीय संस्कृती वाचवण्यासाठी १६७५ मध्ये आपले बलिदान दिले. त्यांच्या या बलिदानामुळे आज आपण स्वाभिमानाने आपली श्रद्धा जोपासू शकतो. त्यांच्या या बलिदानाच्या स्मरणार्थ संपूर्ण महाराष्ट्रात शहिदी समागम आयोजित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला.

हा कार्यक्रम केवळ शीख समाजापुरता मर्यादित नसून सर्व श्रद्धावान नागरिकांचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागपूर, नांदेड आणि नवी मुंबई येथे शहिदी समागम मोठ्या प्रमाणावर पार पडल्याचे सांगून देश-विदेशातून भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचा उल्लेख त्यांनी केला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र आणि पंजाब यांचे नातेही विशेष आहे. संत नामदेव महाराज महाराष्ट्रातून पंजाबमधील घुमान येथे गेले. त्यांच्या रचना गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत. तसेच गुरु गोविंद सिंह महाराष्ट्रात आले आणि त्यांनी नांदेड येथे अखेरचा श्वास घेतला. गुरु गोविंद सिंह यांच्या कुटुंबातील तीन पिढ्यांनी शहादत दिली, असे उदाहरण जगात क्वचितच आढळते.

हेही वाचा –  ‘श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या त्यागाचा देश सदैव ऋणी’; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे कार्य संपूर्ण मानवतेच्या इतिहासातील एक गौरवशाली पान – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखले जाणारे, मानवतेचे रक्षक आणि महान त्यागी श्री गुरु तेग बहादुर साहीबजी यांचा त्याग मानवतेच्या इतिहासातील गौरवपूर्ण पर्व आहे. श्री गुरु तेग बहादुर साहिबजींचे बलिदान हे केवळ इतिहास नाही, तर ते संपूर्ण मानवतेच्या इतिहासातील एक गौरवशाली पान आहे. संस्कृती, परंपरेच रक्षण करण्यासाठी श्री गुरु तेग बहादुर साहीबजी यांनी प्राणांची आहुती दिली. त्यांचे कार्य अतूट श्रद्धा आणि अतूट धैर्याचे उदाहरण आहे.

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्याकडे शस्त्रे नव्हती, पण त्यांच्याकडे सत्य आणि करुणेची ताकद होती. त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवून गोरगरिबांना न्याय मिळवून दिला. सच्चा धर्म तोच, जो दुसऱ्याच्या धर्माचा आदर करतो आणि रक्षण करतो, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र आणि पंजाबच्या ऐतिहासिक संबंधांवर प्रकाश टाकत नांदेड ही गुरु गोविंद सिंहजींची कर्मभूमी आहे, तर संत नामदेव महाराजांनी भागवत धर्माची पताका पंजाबमध्ये फडकवली असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

श्री गुरु तेग बहादुर साहिबजींचे विचार जनमानसात पोहोचवण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. आम्ही राज्यभरात डिजिटल रथांच्या माध्यमातून या महान बलिदानाची गाथा घराघरात पोहोचवित आहोत. शीख, सिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, उदासीन आणि भगत नामदेव (वारकरी) संप्रदाय या सर्व समाजांना एका सूत्रात बांधून श्री गुरु तेग बहादुर साहिबाजी यांचे कार्य व विचार पुढील पिढीपर्यंत पोहचविण्याचा मानस उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांचे मानवतेसाठी अद्वितीय बलिदान आजही प्रेरणादायी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी धर्मस्वातंत्र्य आणि मानवाधिकारांच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान आजच्या काळातही प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, सतराव्या शतकात अन्यायाविरुद्ध निर्भयपणे उभे राहून श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी भारताच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक अस्मितेचे रक्षण केले. त्यांच्या त्यागाचे स्मरण करणे आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे, हीच या समागम कार्यक्रमाची खरी प्रेरणा आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी गुरु नानक देव यांना वंदन करत श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या शिकवणीचा उल्लेख केला. प्रार्थना, परोपकार, सेवा, साधेपणा आणि निर्भयता यांचा संदेश श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी दिला. त्यांच्या वचनांचा समावेश गुरु ग्रंथ साहिबमध्ये असून, त्यांच्या बलिदानामुळे सिख धर्मातील शौर्य आणि त्यागाची परंपरा अधिक बळकट झाली.

“कुणालाही घाबरवू नका आणि कुणालाही घाबरू नका” हा संदेश आजच्या धावपळीच्या जीवनात अधिकच महत्त्वाचा ठरतो, असे नमूद करत समाजात प्रेम, एकता आणि बंधुभाव जोपासण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले. हा ३५० वा शहिदी समागम कार्यक्रम सर्व भाविकांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त त्यांनी व्यक्त केला.

यावेळी वनमंत्री गणेश नाईक, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यस्तरीय समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, अखिल भारतीय धर्मजागरणचे प्रमुख शरदराव ढोले, शहिदी समागम समितीचे मार्गदर्शक बाबा हरनाम सिंह जी, मुखी, दमदमी टकसाल, प्रधान संत समाज, बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज, राज्यस्तरीय समन्वय समितीचे निमंत्रक बल मलकित सिंह, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार मंदाताई म्हात्रे, मुंबईच्या महापौर रितू तावडे, पनवेलचे महापौर नितीन पाटील, आदी उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button