‘पंतप्रधान मोदींची प्रकृती बरी नाही, पण…’; ठाकरे गटाचा टोला
![The headline of the Saamna says that Prime Minister Modi's health is not good](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/Narendra-Modi-and-Uddhav-Thackeray-1-780x470.jpg)
मुंबई | मी बायोलॉजिकल नाही. म्हणजे आईच्या उदरातून माझा जन्म झाला नाही. मला तर वरून परमात्म्याने पाठवले. मी देवाची देणगी आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी एका मुलाखतीत म्हणाले. त्याचं हे विधान सध्या चांगलच चर्चेत आहे. यावरून आता ठाकरे गटाने खोचक टोला लगावला आहे. ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून टीका केली आहे.
सामनाच्या अग्रलेखान नेमकं काय म्हटलं?
निवडणुका संपताच नरेंद्र मोदी यांच्यावर उपचार करून घेणे गरजेचे आहे. मोदी हे वयाच्या पंचाहत्तरीकडे झुकले आहेत. ते २० तास काम करतात. म्हणजे झोपत नाहीत. खाण्यापिण्यातही त्यांना रस नाही. त्याचा परिणाम त्यांच्या मनावर व शरीरावर होताना स्पष्ट दिसत आहे. गोदी मीडियातील चमचे काहीही बोलोत, पण मोदी यांच्यावर प्रचंड ताण आहे व भाजपा त्यांचा वापर तुटेपर्यंत करत आहे. मोदी यांना चांगल्या डॉक्टरची, मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे. एका मुलाखतीत ते म्हणाले, ”मैं तो ‘अविनाशी’ हूं. मैं काशी का हूं.” भगवान शंकरास अविनाशी म्हटले जाते. ज्याचा कधीच विनाश होत नाही असा तो अविनाशी. मोदी यांनी स्वतःला स्वयंप्रभू शिवशंकर म्हणून जाहीर करून टाकले. हे मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्याचेच लक्षण आहे.
स्वयंप्रभूंनी एका प्रचार प्रवचनात प्रजेला सांगितले की, ‘मी ८५ कोटी तेला फुकट धान्य देतो. त्यामुळे तुम्ही मला मते द्या. नाहीतर तुम्हाला पाप लागेल.’ मोदी यांची ही विधाने म्हणजे देववाणी असल्याचे त्यांच्या भक्तांना वाटत असेल तर भक्तांनीही आपापली डोकी तपासून घेतली पाहिजेत. मनाचा आजार बरा नाही. शरीराचा आजार बरा होऊ शकतो. मनाचा आजार बरा होत नाही. त्यामुळे आम्हाला स्वयंप्रभू व त्यांच्या भक्तांची चिंता वाटते.
हेही वाचा – अजित पवारांची नार्को टेस्ट करा’; पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणावरून दमानियांनी अजितदादांना घेरलं
स्वयंप्रभू गरीबांना फुकट धान्य देतात व त्या बदल्यात ते मतांची वसुली करतात. भगवान कृष्ण किंवा श्रीराम हे त्यांच्या त्रेतायुगात गरीब प्रजेला फुकटात धान्य देऊन त्यांच्या सिंहासनास संरक्षण मागत होते काय? राम-कृष्ण हे निवडणुका लढवून, निवडणुकांत हेराफेरी करून, लोकांना मूर्ख बनवून देवत्वास प्राप्त झाले होते काय? यावर नव्याने संशोधन करणे गरजेचे आहे. कारण मोदी हे फक्त देव नसून ‘देवांचा देव महादेव’ असल्याचे त्यांनी जाहीर केले. तत्त्वचिंतक, विचारवंत रजनीश किंवा ‘ओशो’ यांनीही स्वतःला ‘भगवान’ म्हणून जाहीर करून टाकले व रजनीश यांचे भक्त आजही त्यांना ‘भगवान रजनीश’ म्हणून संबोधतात. त्यामुळे मोदी यांना यापुढे ‘ओशों’प्रमाणे ‘भगवान मोदी’ असेच संबोधायला हवं. ४ जूननंतर भगवान महोदयांचा पराभव होईल. त्यानंतर त्यांना ‘माजी भगवान’ असे उल्लेखावे लागेल.
मी देवाची देणगी आहे. यावर या स्वयंप्रभूंचे चमचे, ”वाह…वाह…वाह…” करीत टाळ्या वाजवतात व ”प्रभू की जय हो” म्हणतात. यावर राहुल गांधी यांनी जाहीर सभेत स्वयंप्रभूंना एक नाजूक प्रश्न विचारला आहे, ”आपल्याला आपण देव असल्याचे भास नक्की कधी होतात? म्हणजे सकाळी होतात, संध्याकाळी होतात की, झोपेत म्हणजे स्वप्नावस्थेत होतात?” राहुल गांधी हे स्वयंप्रभू मोदींची ही अशी खिल्ली उडवतात. राहुल गांधी यांनी मोदींचा अक्षरशः ‘पप्पू’ केला व मोदी हे या निवडणुकीत ‘पप्पू’ अवस्थेत पोहोचले. हीच ‘पप्पू’ अवस्था अविनाशी आहे. मोदी हे अविनाशी अवस्थेला पोहोचले आहेत ते असे.
मोदी यांची प्रकृती बरी नाही, पण लक्षात कोण घेतो? त्यांना मनाचा आजार म्हणजे मनरोग बळावला आहे. त्यांना विश्रांती व उपचारांची गरज आहे. मोदी यांना घरसंसार, नातीगोती असे काहीच नसल्याने या वयात व मानसिक अवस्थेत काळजी घ्यायची कोणी? ऐसा कोई सगा नही, जिसको मोदी ने ठगा नही. त्यामुळे स्वयंप्रभू अवस्थेला पोहोचूनही मोदी एकाकी आहेत. मनाने ते कमजोर पडले आहेत. कमजोर मनाच्या व्यक्तीलाच विचित्र भास होतात. स्वतःविषयी भ्रामक कल्पना मनात आकार घेतात. मोदी यांचा अविनाश हा त्यातलाच प्रकार आहे”, असं म्हणत, ”४ जूननंतर भाजप शिल्लक राहिलाच तर मोदींच्या मन-आजाराची त्यांना काळजी घ्यावीच लागेल”, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.