फिल्म इंडस्ट्रीतल्या बड्या कलाकारांना जनतेनं नाकारलं
लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव
मुंबई : लोकशाहीचा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल काल समोर आले. काहीचे धक्कादायक तसंच चकीत करणारे हे निकाल लागले. अनेक बड्या चेहऱ्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. यात एक नाव म्हणजे स्मृती इराणी. उत्तर प्रदेशात अमेठी लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पराभूत झाल्या आहेत. स्मृती इराणी यांच्यासोबत अनेक सेलिब्रिटींना जनतेनं नाकारलं आहे. तर अभिनेते राज बब्बर यांचाही या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. २०२४च्या या लोकसभेच्या निवडणुकीत सेनिसृष्टीतले अनेक दिग्गज मैदानात उतरले होते, काहींच्या वाट्याला विजय आला तर, कोणाला पराभवाची चव चाखावी लागली आहे.
स्मृती इराणी
अभिनेत्री आणि भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अमेठी मतदार संघातून निवडणूक लढवली होती. कॉंग्रेसचे उमेदवार किशोरी लाल शर्मा यांनी त्यांचा परभाव केला. किशोरी लाल शर्मा हे एक लाखांहून अधिक मताधिक्यानं निवडूण आले आहेत.
अभिनेते राज बब्बर
तसंच बॉलिवूड अभिनेते राज बब्बर गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात आहे, पण या निवडणुकीत त्यांना जनतेनं नाकारलंय. त्यांनी हरियाणाच्या गुरुग्राम मतदार संघातून निवडणूक लढवली होती, त्यांना विजय मिळवता आला नाही. भाजपच्या इंद्रजीत सिंह यांनी ७५ हजारांहून अधिक मतांनी बब्बर यांना मात दिली.
भोजपुरी स्टार निवडणुकीत फ्लॉप
भोजपुरी इंडस्ट्रीतले अनेक सेलिब्रिटी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. पण काही जणांना विजय खेचून आणता आला नाही. भोजपुरी स्टार दिनेश लाल यादव उर्फ निरहुआ भारतीय जनता पक्षाकडून उभे होते.उत्तर प्रदेशातल्या आजमगढ मतदार संघातून त्यांना पक्षानं तिकीट दिलं होतं. पण त्यांच्या वाट्याला पराभव आला. समाजवादी पक्षाच्या धर्मेंद्र यादव यांनी १ लाख ६१ हजार मतांनी त्यांचा पराभव केलाय.





