ग्राऊंड रिपोर्ट : राष्ट्रवादीत त्सुनामीपूर्वीची शांतता!
आयात उमेदवार नकोच ;…अन्यथा बंडखोरीची ‘मशाल’ पेटणार!
पिंपरी : विशेष प्रतिनिधी
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीवरून पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीत वादळापूर्वीची नव्हे, तर त्सुनामीपूर्वीची शांतता आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारीवर राष्ट्रवादीने ‘घड्याळ’ चिन्हासह दावा केला. मात्र, संबंधित उमेदवार आयात करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये प्रचंड नाराजी असून, पक्षविरोधी भूमिका घेण्याचा निर्धात नाराज गटाने घेतला आहे.
चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी. याकरिता भारतीय जनता पार्टीकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तत्पूर्वी, राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ही निवडणूक राष्ट्रवादीच्या ‘घड्याळ’ चिन्हावर लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, उमेदवार आयात करु नये, अशी स्थानिक पदाधिकाऱ्यांची आग्रही मागणी आहे.
पक्षश्रेष्ठींनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीतील इच्छुकांपैकी कोणालाही उमेदवारी द्यावी, या मागणीने जोर धरला आहे. आयात उमदेवार देण्यास राष्ट्रवादीतून जोरदार विरोध सुरू झाला आहे. इच्छुकांनी आणि पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी तसे पक्षाच्या वरिष्ठांना स्पष्टपणे सांगितले आहे. मात्र वरिष्ठांनी उमेदवार आयात करण्याचा निर्णय घेतल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्यामुळे चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादीत अंतर्गत कलह उफाळून येणार असून, बंडाळी होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
२०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला चिंचवड मतदारसंघात उमेदवार सापडला नव्हता. त्यामुळे पक्षावर नामुष्की ओढावली होती. शिवसेनेच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा देण्याची वेळ राष्ट्रवादीवर आली होती. भाजपाविरोधात सर्वपक्षीय एकच उमेदवार देऊनही चिंचवड मतदारसंघात भाजपाचा पराभव झाला नाही. आता पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने चिंचवड पोटनिवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. पोटनिवडणूक लढविण्यासाठी पक्षाकडे अनेकजण तयार असतानाही उमेदवार आयात केल्यास राष्ट्रवादीतील अनेकजण वेगळा विचार करण्याच्या मानसिकतेत आहेत.
नाना काटेंची तयारी पूर्ण पण…
वास्तविक, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी विधानसभा पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून काटे समर्थक मतदार संघात भेटी-गाठी आणि नियोजन करीत आहेत. विशेष म्हणजे, सुमारे २५० तरुणांची टीम मतदार संघात निवडणूक व्यवस्थापन आणि कामकाज पाहत आहे. काटे यांनी भाजपाबहूल प्रभागात स्वत: आणि पत्नी शीतल काटे यांना निवडून आणण्याचा करिष्मा प्रचंड मोदी लाटेतसुद्धा केला होता. पिंपळे सौदागर, रहाटणी, सांगवी, काळेवाडी, थेरगाव, वाल्हेकरवाडी आदी भागात काटे यांना मानणारा वर्ग तुलनेत जास्त आहे. राष्ट्रवादीची संघटनात्म्क ताकद भाजपाच्या तोडीची आहे. अशा परिस्थितीत नाना काटे यांना उमेदवारी निश्चित करावी, अशी मागणी काटे समर्थकांनी केली आहे. कोणत्याही परिस्थितीत आयात उमेदवाराची साथ देणार नाही, असा निर्धार राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून बोलून दाखवला जात आहे.