त्या सीडीआरची चौकशी होणार, अशोक खरात प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis : सध्या अशोक खरात प्रकरण राज्यात चांगलंच गाजत आहे? या प्रकरणावर बोलताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अशोक खरात यांच्यात 17 वेळा फोन कॉल्स झाल्याचा दावा केला आहे. आपण सीडीआरच्या आधारे हा खुलासा केला अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे. दरम्यान त्यानंतर आता दमानिया यांच्याकडे सीडीआर कसा आला? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पहिली गोष्ट अशी आहे की, अशा पद्धतीने सीडीआर प्राप्त करून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. तो अधिकार फक्त जी संबंधित तपास यंत्रणा आहे, त्यांनाच तो अधिकार आहे. त्यामुळे हा सीडीआर कशापद्धतीने लीक झाला? तो कुणी लीक केला? या संदर्भातील चौकशी राज्य सरकार करेल. मला वाटतं अशा सेंसेटिव्ह केसमध्ये आरोप प्रत्यारोप करून चालत नाही. ज्याच्याविरोधात सबळ पुरावा असेल त्यांच्याविरोधात कारवाई होईल. कोण कोणाशी बोललं, कोणी कोणाशी काय केलं? याच्या आधारावर यंत्रणा काम करत नाही. अशोक खरात याने जी काही घाणेरडी कामं केली आहेत, त्यात जर कोणी सहभागी असेल तर त्याला आम्ही सोडणार नाहीत, त्यामुळे हा सीडीआर कुठून आला? त्याची देखील चौकशी राज्य सरकार करेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा – अवकाळी पावसामुळे राज्यातील २९ जिल्ह्यांत 2 लाख हेक्टरवरील पिकांना फटका
दरम्यान अशोक खरातच्या संपत्तीचा पूर्ण तपास आम्ही करणार आहोत, त्याने जे वेगवेगळे अकाऊंट उघडले आहेत, ते आमच्या लक्षात आले आहेत, त्याचे वेगवेगळे ट्राझेक्शन देखील आमच्या लक्षात आले आहेत. आणि आता या प्रकरणात लोक स्वत:हून समोर येऊन माहिती देत आहेत, त्यामुळे एसआयटीला देखील मोठ्या प्रमाणात माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सर्व पाळमुळे आम्ही खोदून काढू. मला वाटतं एसआयटी योग्य पद्धतीने काम करत आहे, सर्वांनी एसआयटीवर विश्वास ठेवावा, असंही यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते नाशिकमध्ये बोतल होते.





