ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

तावडे पैसे वाटप प्रकरणावर संजय राऊतांची टीका

'निवडणुका लोकशाहीचा उत्सव राहिला नसून भ्रष्ट पैशांचा उत्सव झाला'; संजय राऊत

नालासोपारा : राज्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु आहे. काल बुधवारी २० नोव्हेंबर महाराष्ट्रात मतदान पार पडले. राज्यातील दिग्गज नेत्यांचं भवितव्य आता मतपेटीत कैद झालं आहे. त्याच मतदानापूर्वी एक दिवस भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप होत आहे. नालासोपारा मतदारसंघात विनोद तावडे यांनी पैसे वाटले, असा आरोप बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर यांनी केला. यानंतर नालासोपारा पूर्वमध्ये असलेल्या विवांता हॉटेलमध्ये विनोद तावडेंना बविआ कार्यकर्त्यांना घेराव घातला आणि त्यामुळे मोठा गोंधळ पाहायला मिळाला. आता यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे. तावड्यांकडे पाच कोटी होते, पण आयोगाने फक्त नऊ लाख कागदावर आणले असा आरोप आमदार ठाकूर करत आहेत. मग वरचा मलिदा सुखरूप बाहेर काढण्यासाठी पोलीस, आयोगाच्या लोकांनी कोणत्या दरवाजाचा वापर केला? असा आरोप संजय राऊतांनी केला. नालासोपाऱ्यात ‘तावडे’ यांचा गेम शिंद्याने केला की भाजपमधील अन्य कोणी केला, हे रहस्यच आहे, असे विधान संजय राऊतांनी केले.

संजय राऊत काय म्हणाले?
महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीस बट्टा लावण्याचा हा प्रकार बिनबोभाट घडत असताना आपला तो निवडणूक आयोग झोपाच काढत असावा. नालासोपारा, विरार भागात भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे हे पैशांच्या बॅगा घेऊन एका हॉटेलात शिरले व वाटप सुरू करताच तेथे निवडणूक आयोगाचे लोक पोहोचले नाहीत, तर हितेंद्र ठाकुरांच्या बहुजन विकास आघाडीचे लोक पोहोचले. चार तास तावड्यांना घेराव घालून ‘जाम’केले. तावडे यांच्या खोलीत पैसे होते, पण निवडणूक आयोगाने वेळेत पंचनामा करून गुन्हा दाखल केला नाही, असे संजय राऊत म्हणाले.

गुन्हा दाखल केला तो आचारसंहितेचा भंग केल्याबाबत. म्हणजे निवडणूक आयोगाचे नियम मोडून पत्रकार परिषद घेतली वगैरे किरकोळ विषयांवर. तावड्यांकडे पाच कोटी होते, पण आयोगाने फक्त नऊ लाख कागदावर आणले असा आरोप आमदार ठाकूर करत आहेत. मग वरचा मलिदा सुखरूप बाहेर काढण्यासाठी पोलीस, आयोगाच्या लोकांनी कोणत्या दरवाजाचा वापर केला? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थितीत केला.

तावडेंचा गेम कोणी केला?
सांगोल्याच्या टोल नाक्यावर शिंदे गटाच्या आमदारांचे पंधरा कोटी पकडले गेले होते, पण थातूरमातूर रक्कम जप्त करून उरलेली रक्कम ज्याची त्याला परत करून निवडणूक आयोग व पोलिसांनीही आपले मिंधेगिरीचे कर्तव्य पार पाडले. सांगोल्यात गाडी व ड्रायव्हर हा सरळ आमदाराचा होता. तरीही त्यांना वाचविण्याचा थुकरटपणा हा केलाच. नालासोपाऱयात ‘तावडे’ यांचा गेम मिंध्याने केला की भाजपमधील अन्य कोणी केला, हे रहस्यच आहे.

कारण नंतर एक फोन आला व ठाकूर मंडळ त्याच तावड्यांसह कुठेतरी बसायला व बोलायला एकाच गाडीतून गेले. जनतेला मूर्ख बनविण्याचे हे खेळ लोकशाहीत सुरू आहेत. महाराष्ट्रात लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पैशांचे वाटप झाले. पैशांचा महापूरच आला. या महापुरात कोण कसे वाहून गेले व कोण निष्ठेच्या विटांवर तरले हे पुढच्या 72 तासांत कळेल, पण निवडणुका आता लोकशाहीचा उत्सव राहिला नसून भ्रष्ट पैशांचा उत्सव झाला हे नक्की, असेही संजय राऊत म्हणाले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button