स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्या : अजित पवार
चिंचवड येथील मेळाव्यात प्रतिपादन
![Local Self-Government, Elections, Local Level, Take Decision, Ajit Pawar, Chinchwad, Gathering at, Proposition,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/Ajit-Pawar-6-780x470.jpg)
पिंपरी : महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर नेत्यांनी निर्णय घ्यायचा आहे. स्वबळावर लढायचे की युती करून हा सर्व तुमचा निर्णय असेल, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि.25) चिंचवड येथे व्यक्त केले.
शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पवार बोलत होते.
या वेळी आमदार अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, भाऊसाहेब भोईर, राहुल भोसले, विनोद नढे, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, युवकचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, आपण भाजप आणि शिवसेनेबरोबर गेलो असलो तरी निवडणुकांसाठी कॉंग्रेसमध्ये जसे जागा वाटप केले होते. त्यानुसार जागा वाटप केले जाणार आहे. पक्ष आणि चिन्ह आपल्याकडे असून आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका या महायुतीबरोबर आपण लढणार आहोत.
चंद्रयान-3 मुळे भारताची जगात मान उंचावली आहे. देशातील 65 टक्के जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मान्य करते. त्यांना मोदीच पंतप्रधान म्हणून हवे आहेत. देश चालविणारा कारभारी चांगला असेल तर देशाचा सर्वांगींन विकास होत असतो. गेल्या नऊ वर्षांच्या काळात महामार्ग झाले. विविध भागात रेल्वे सुरू झाल्या. देशात उच्च दर्जाचे विमानतळ होत असल्याचेही पवार म्हणाले.