‘गाय आमची माता, तिला जनावरांच्या यादीतून वगळा’; स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची केंद्र सरकारकडे मागणी

Swami Avimukteshwaranand Saraswati | गौ प्रतिष्ठा ध्वज स्थपना यात्रेदरम्यान बद्रीनाथ ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केंद्र सरकारला विनंती केली आहे. सरकारने बनवलेल्या जनावरांच्या यादीत गायीचा समावेश आहे. परंतु, सनातन धर्मात गायीला मोठी प्रतिष्ठा आहे. गायीला आम्ही माता म्हणून पूजतो. त्यामुळे गायीला जनावर म्हणणं चुकीचं आहे. गायीला प्राण्यांच्या यादीतून वगळण्याची मागणी अविमुक्तेश्वरानंद यांनी केली आहे.
स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, गायीला संरक्षण मिळवून देणे व गायींची सेवा करणे हा या यात्रेचा उद्देश आहे. मी येथे गौ प्रतिष्ठा ध्वज प्रतिष्ठापना यात्रेसाठी आलो आहे. गोमातेचं सरंक्षण व संवर्धनासाठी सरकारने कायदा करावा, ही आमच्या या यात्रेची प्रमुख मागणी आहे. त्यासाठीच आम्ही ही यात्रा काढली आहे.
हेही वाचा – ‘..तर मी भाजपाचा प्रचार करेन’; अरविंद केजरीवाल यांचं विधान चर्चेत
सरकारच्या यादीत गायीला प्राण्यांच्या श्रेणीत ठेवण्यात आलं आहे. परंतु, भारतीय सभ्यता व संस्कृतीत गायीला देवी म्हटलं गेलं आहे. गायीला माता म्हणत तिचं महत्त्व सांगितलं आहे. सनातन धर्म मानणारे गायीला माता म्हणतात. त्यामुळे गायीला प्राणी म्हणणं हा सनातन धर्माचा, सनातन धर्माच्या अनुयायांचा अपमान आहे. आपली परंपरा आपण पुढे न्यायला हवी. त्याचाच एक भाग म्हणून सरकारने जारी केलेल्या जनावरांच्या यादीतून गायीला वगळावं लागणार आहे, स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले.
गोमातेचं सरंक्षण आणि संवर्धनासाठी सरकारने कायदा केल्यानंतर लोकांनाही याचं व सनातन धर्माचं गांभीर्य समजेल. त्यामुळे लोकांचा विचार करण्याची पद्धत, गायीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल, असं स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले.





