‘मला जे अजितदादा आठवतात त्यांना दिल्लीला जाणं आवडत नाही’; सुप्रिया सुळेंचा टोला
![Supriya Sule said that the Ajitdada I remember does not like to go to Delhi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/Supriya-Sule-780x470.jpg)
मुंबई | महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. महाविकास आघाडी विरूद्ध महायुती असा सामना असणार आहे. मात्र, अजून महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला नाही. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, खेड शिवापूर या ठिकाणी नेमकी किती रोख रक्कम सापडली? याची पारदर्शी पद्धतीने चौकशी व्हायला हवी अशीही मागणी त्यांनी केली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, खेड-शिवापूर हा भाग माझ्या मतदारसंघाचा आहे. मी गेल्या १८ वर्षांपासून त्या ठिकाणाहून अनेकदा ये-जा करते. तिथले भाजीवाले, शेतकरी सगळेच मला ओळखतात. त्या ठिकाणी एका कारमध्ये पाच कोटीची रक्कम सापडल्याचं सांगण्यात आलं. मला पत्रकारांनी जी माहिती दिली त्यानुसार त्या कारमध्ये १५ कोटी रुपये होते. तसंच मला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार कारमध्ये १५ ते ५० कोटींच्या मधली एक रक्कम होती. सरकारने या प्रकरणाची पारदर्शीपणे चौकशी केली पाहिजे. तसंच नोटबंदी झाल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम मिळतेच कशी? या प्रकरणात रक्कम कुणाची? कार कुणाची? या सगळ्याची पारदर्शी चौकशी झाली पाहिजे.
हेही वाचा – दुसरे ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात, अमित ठाकरे यांना माहीम मधून उमेदवारी
अजित पवार हे असे नेते आहेत ज्यांना दिल्लीला जायला आवडत नाही. मी ज्या अजितदादांना ओळखते त्यांना तरी दिल्लीला सारखं जायला आवडत नाही. ते दिल्लीला गेलेत कशासाठी ते मला माहीत नाही. कारण माझा आणि त्यांचा संपर्क बऱ्याच दिवसांपासून नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
महाविकास आघाडीचे सगळे निर्णय आम्ही एकत्र मिळून करतो आहोत. प्रत्येकाने ठरवायचं की इथे निर्णय घ्यायचा की दिल्लीला. पण आम्ही सगळे बरोबर आहोत, जागावाटपाचा प्रश्नही लवकरच सुटेल. येत्या दोन ते तीन दिवसांत तुम्हाला सगळंच चित्र स्पष्ट होईल. लोकांच्या मनात जे उमेदवार आहेत त्याच लोकांना महाविकास आघाडीकडून संधी देण्यात येईल, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.