‘पिंपरी-चिंचवडचा कारभारी वेगळा होता म्हणून..’; सुप्रिया सुळेंनी अजितदादांना डिवचले
![Supriya Sule said that since the administrator of Pimpri-Chinchwad city was different, I was not paying much attention in the city.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/09/Supriya-Sule-and-Ajit-Pawar-780x470.jpg)
पिंपरी | राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते समरजीतसिंग घाटगे यांच्या कागल मतदारसंघातील नागरिकांचा आज पिंपरी-चिंचवड शहरात मेळावा पार पडला. या मेळाव्याला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संबोधित केलं. यावेळी बोलताना त्यांनी अजित पवार यांना डिवचले आहे.
पिंपरी-चिंचवड शहराचा कारभारी वेगळा असल्याने मी शहरात जास्त लक्ष देत नव्हते. आले तरी कार्यक्रम घेतला नाही. मला कोणाच्या कामात ढवळा-ढवळ करायला आवडत नाही, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना डिवचले आहे. तसेच, एका ताटात जेवल्यास त्या व्यक्तीचं ऋण आयुष्यभर विसरू नये. तो व्यक्ती सोबत असो वा नसो, कारण त्याने आपल्या सुख-दुःखात साथ दिलेली असते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हेही वाचा – गड किल्ले जागतिक वारसा स्थळाच्या यादीत नामांकनाच्या प्रचारासाठी ‘रन फॉर फोर्ट’ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
सध्याचे राजकारण बघता ते बदलायला हवं. माझ्या आईला देखील सध्याचे राजकारण आवडत नाही. समाजात तेढ निर्माण होईल अशी भाषणे सध्या नेते करत आहेत. एक दिवस पोलिसांना घरी पाठवा मग बघतो.. हे कोण सांगणार?. हा देश संविधानावर चालतो. कुठल्या अदृश्य शक्तीच्या मनमानीवर चालत नाही. अशा धमक्या तुम्ही कोणाला देता, असा टोलाही सुप्रिया सुळेंनी लगावला.
बारामती लोकसभेदरम्यान प्रत्येक संस्था माझ्या विरोधात होती. एक माणूस माझ्यासोबत नव्हता. आम्हाला बूथ कमिटीदेखील चोरून बनवावी लागत होती. अनेक ठिकाणी बूथ कमिटीला माणूस मिळत नव्हता. अनेक दशकांचे ऋणानुबंध असलेल्या व्यक्तीच्या आम्ही घरी गेलो होतो. त्या व्यक्तीने आमचा तोंडावर दरवाजा बंद केला होता. मतांच्या माध्यमातून त्यांनी राग व्यक्त केला, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.