‘येत्या काही दिवसांमध्ये आपलं सरकार येणार’; खासदार सुप्रिया सुळेंचं विधान
![Supriya Sule said that our government will come in the next few days](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/Supriya-Sule--780x470.jpg)
पुणे | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यातील सर्वच पक्ष सध्या जोमाने कामाला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. येत्या काही दिवसांमध्ये आपलं सरकार येणार असल्याचं त्या म्हणाल्या. तसेच लोकसभा निवडणुकीच्या काळात मी आणि अमोल कोल्हे चिंतेत होतो, पण तुमची ताकद होती त्यामुळे आम्ही निवडून आलो, असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमदार, पदाधिकारी, कारखान्यातले पदाधिकारी, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगर पंचायती सगळे सोडून गेले. मी आणि अमोलदादा (अमोल कोल्हे) रोज विचार करायचो आता पुढे काय होणार? आम्हाला दोघांना तुमची ताकदच माहीत नव्हती. पक्षाची ताकद तुम्ही सगळे आहात. संघर्षाच्या काळात आम्ही काळजी करत होतो कारण पक्ष नव्हता, चिन्ह नव्हतं, नेते नव्हते काहीही नव्हतं. आम्ही दोघं एकमेकांना समजावत होतो. पण आता आम्हाला कळतंय की मतदार राजा आमच्याबरोबर होता. बाकी सगळे निघून गेले होते.
हेही वाचा – ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ चा लाभ कायमस्वरूपी सुरू राहणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आमचं भाग्य आहे की आम्हाला तुम्हा सगळ्यांचा विश्वास, प्रेम लाभलं हेच नातं आम्ही कायम ठेवू, बारामती ही आपली आन, बान आणि शान आहे. नवेल ब्रिजवर अपघात व्हायचे आपण नितीन गडकरींची मदत घेतली. आता इंदु चौकातही आपल्याला तसाच मार्ग काढायचा आहे, तो रस्ता आता आपल्याला सुधारयाचा आहे. पुण्यात, बारामतीत अपघात वाढत चालले आहेत, गुन्हे वाढत आहेत. चांगलं प्रशासन द्यायचं असेल तर आपल्याला सरकार बदलायचं आहे हे लक्षात ठेवा. येत्या काही महिन्यांमध्ये आपलं सरकार येणार आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मला परवाच एका पत्रकाराने सांगितलं की बारामतीत जे घडलं ते अपेक्षित नव्हतं. मी त्यांना सांगितलं की लोकांनी आम्हाला निवडून दिलं आहे. मी अंडर कॉन्फिडंट होते आणि ते ओव्हर कॉन्फिडंट होते. पण आज तुम्हाला सांगते बारामती आणि शिरुर मतदारसंघ एकाच माणसाला कळतो त्या माणसाचं नाव आहे शरद पवार. शरद पवार आणि तुमचं हे प्रेमाचं नातं आहे ते काही कुठल्या योजनेचं नातं नाही. एक लक्षात घ्या नाती १५०० रुपयांनी जोडली जात नाहीत. कुणीतरी म्हणालं की एक गेली म्हणून बाकीच्या बहिणी जोडल्या. पण तसं होत नाही असं म्हणत सुप्रिया सुळेंनी लाडकी बहीण योजनेवरुनही अजित पवारांना टोला लगावला. पैशांच्या नात्याने व्यवहार होतात, नातं जुळत नाहीत. झालं गेलं गंगेला मिळालं त्यांनाही शुभेच्छा जिथे असेल तिथे सुखाने नांदा, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.