‘मी अजितदादा विरोधात कधीच भूमिका मांडणार नाही’; सुप्रिया सुळे यांचं विधान चर्चेत
मुंबई : अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शरद पवार गटातील नेते त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केलं आहे. मी अजितदादा विरोधात कधीच भूमिका मांडणार नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
तुम्ही अजित पवार यांच्यावर थेट आरोप करित आहात का? असा सवाल सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. यावर त्या म्हणाल्या, माझ्यावर मोठ्या भावाचा मानसन्मान राखण्याचे संस्कार झाले आहेत आणि मी त्याच संस्कृतीत वाढले आहे. आदरणीय अजित दादा हे माझे मोठे बंधू आहेत. मी अजितदादा विरोधात कधीही भूमिका मांडली नाही आणि मांडणारदेखील नसल्याचे त्या म्हणाल्या.
हेही वाचा – आमदार अपात्र प्रकरणाच्या सुनावणीचे लाईव्ह प्रेक्षेपण करा; विजय वडेट्टवार यांची मागणी
मागील दहा वर्षांत केंद्रातील भाजपा सरकारने विविध तपास यंत्रणांचा गैरवापर करून पक्ष संपविण्याचे काम केले आहे. या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकवेळा भाषणामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नॅचरल करप्ट पार्टी म्हणून उल्लेख केला आहे. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक घटक त्यांच्यासोबत गेला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता ‘तो’ उल्लेख करीत नाही. त्यामुळे मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रांजळपणे विचारायचे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केलेले आरोप राजकीय होते की खोटे होते, की खरे होते. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेले आरोप खरे असतील तर त्याची चौकशी झाली पाहिजे. जर आरोप खोटे असतील तर दिलगिरी व्यक्त केली पाहिजे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.