पिंपरी-चिंचवडमधील सोसायटीधारकांना मैलामिश्रित पाण्याचा पुरवठा
चिखली येथील देहू-आळंदी रोडवरील सोसायटी धारक त्रस्त
![Supply of mixed water to society holders in Pimpri-Chinchwad](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/sanjivan-sangale-780x470.jpg)
पिंपरी : चिखली येथील देहू-आळंदी रोडवरील सोसायटीधारकांना गेल्या अनेक दिवसांपासून मैलामिश्रित पाण्याचा पुरवठा होत आहे. ड्रेनेज लाईनचे पाणी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमधे मिसळत असल्याने ही समस्या निर्माण झाली. वारंवार तक्रार करूनही त्याच्या दुरूस्तीकडे महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग दुर्लक्ष करत आहे. त्या विरोधात नागरिक संताप व्यक्त करत आहेत. त्वरीत यावर उपाययोजना करण्याची मागणी चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने करण्यात आली आहे. नुकतेच नागरिकांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे ही तक्रार केली आहे.
चिखली येथील देहू-आळंदी रोडवरील अभंग विश्व फेज-1, अभंग विश्व फेज-2, मिरा ऑर्किड, भागीरथी ग्लोरिया, गवारे अंगण या सर्व सोसायट्यांमधे मैलामिश्रित पाणी येत आहे. या सर्व सोसायट्यांमधील लहान मुले, महिला, वयोवृद्ध नागरिक हे जुलाब, उलट्या यासारख्या आजाराने त्रस्त आहेत. या भागामध्ये जाणारी ड्रेनेज लाईन आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेची पाण्याची लाईन एकत्रच जात असल्याने ड्रेनेज लाईनचे पाणी पिण्याच्या पाण्याच्या लाईन मध्ये मिसळत आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना आणि संबंधीत अधिकाऱ्यांना ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. तरी या बाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.
हेही वाचा – मनसेच्या वतीने दहावी, बारावी विद्यार्थी, आदर्श शाळा व आदर्श शिक्षकांचा सत्कार
महापालिकेच्या या गलथान कारभारामुळे या परिसरातील सुमारे 4 हजार नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्याला आळा घालणे आवश्यक आहे. त्यासाठी ड्रेनेजच्या पाईपलाईन दुरूस्ती करावी. पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन मध्ये मिसळणारे मैलामिश्रित पाण्याला थांबवावे. तोपर्यंत या भागातील सोसायटी धारकांना होणारा पाणीपुरवठा थांबवावा. टॅंकरद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी संजीवन सांगळे यांनी केली आहे. तसेच मैलामिश्रित पाण्याचा पुरवठा होण्याची समस्या कायमस्वरूपी बंद करावी, अशी मागणीही फेडरेशनच्या वतीने आयुक्तांना केली.
चिखली येथील देहू-आळंदी रोडवरील या सहा सोसायट्यांमधे मागील 15 दिवसांपासून मैलामिश्रित दूषित पाणी येत आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला संबंधीत परिस्थिती निदर्शनास आणून दिली आहे. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्वरीत दुरूस्ती करून शुद्ध पाण्याचा पुरवठा न केल्यास फेडरेशनच्या वतीने मैला मिश्रित पाणी घेऊन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना प्यायला देऊ.
संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशन.