‘सातत्याने मला संपवण्याचा प्रयत्न होतोय’; भरसभेत सुजय विखे पाटलांना अश्रू अनावर
![Sujay Vikhe Patal shed tears in the current meeting](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/Sujay-Vikhe-780x470.jpg)
Sujay Vikhe Patil | संगमनेरमध्ये सुजय विखे पाटील आणि जयश्री थोरात यांच्यातील वाद विकोपाला पोहोचला आहे. भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबद्दल काढलेल्या अश्लाघ्य उद्गारांमुळे त्यांना अटक झालेली असताना आता सुजय विखे यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायावरही न्याय मागितला आहे. यावेळी चाललेल्या भाषणात सुजय विखे यांना अश्रू अनावर झाले होते.
सुजय विखे म्हणाले, की कोणालाही घाबरायचं कारण नाही. मतदान गुप्त असतील. बंद पेटीत असतं. ते येतील आणि आमिष दाखवतील. छोट्याश्या आमिषासाठी मुलांच्या भवितव्याशी तडजोड करू नका. मग तुम्हाला कोणी वाचवायला येणार नाही. याच दुष्काळात आणि दहशतीखालील आयुष्यभर जगत राहाल. मला अपेक्षा नाहीय की माझ्यासाठी जाळपोळ व्हावी. त्या मुलाच्या पाठीवर काठीचे वळ पाहिले तेव्हा भारावून गेलो. तो मुलगा दादा दादा करत होता. या दिवसासाठी मी संगमनेरमध्ये नाही आलो. तुम्ही तुमच्या मुलांना मारताय, माझ्यासाठी? असं मी काय केलंय. तुम्हाला मारयचंय तर मला माला. पण दारू पिऊन १८ वर्षांच्या मुलांना मारताय? यासाठी परिवर्तन करायचं आहे.
हेही वाचा – मिशन विधानसभा निवडणूक : अवघे अवघे या… उमेदवारी अर्ज दाखल करू या!
मी एकुलता एक मुलगा आहे आणि मला मारायचा प्रयत्न करता? मात्र तुम्ही महाराष्ट्राला जे दाखवायचा प्रयत्न करता ते किती खोटे आहेत, तेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायला या ठिकाणी आलो आहे. आमच्या व्यासपीठावर चूक झाली, मान्य करतो, दिलगिरी व्यक्त करतो. पण जर आदिवासी महिलांवर झालेल्या अन्यायावर न्याय होणार नसेल तर मला इथे येण्याची इच्छा नाही. जी आग माझ्या गाडीला लावण्याचा प्रयत्न केला ती आग तुमच्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही. जे कोयते-काठ्या माझ्यासाठी आणले ते तुमच्यासाठी यायला वेळ लागणार नाही. त्यामुळे संगमनेरकर आता जागे व्हा, असं म्हणत सुजय विखेंनी भावनिक सादही घातली.
हे आता तुमच्या हातात आहे. मला जे करायचं ते केलंय. सातत्याने मला संपवण्याचा प्रयत्न केला गेला. सुजय विखेच्या मागे सगळे हात धुवून लागलेत. पक्षातील, पक्षाबाहेरचे सगळेच. कारण त्यांना माहितेय ज्या दिवशी सुजय विखे संपेल तेव्हा या तालुक्यातील गोर गरीब माणसाची उमेद संपेल. गोर-गरिबांचा आवाज संपेल. ज्या दिवशी सुजय विखे संपेल त्या दिवशी विकास संपेल, असंही सुजय विखे म्हणाले. यावेळी त्यांच्या डोळ्यांत अश्रू अनावर झाले होते. त्यांनी थोडावेळ विश्रांती घेऊन पाणी पिऊन पुन्हा आपलं भाषण सुरू केलं.