breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

‘मावळ मतदारसंघातील सर्व 25 लाख मतदार माझे नातेवाईक’; खासदार श्रीरंग बारणे

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत हीच देशातील बहुतांश नागरिकांची भावना - खासदार बारणे

विकास कामे व मतदारांशी सातत्याने संपर्क यामुळे विक्रमी मताधिक्य मिळेल – खासदार बारणे

पिंपरी | मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्व 25 लाख मतदार हे माझे नातेवाईक आहेत, असे उद्गार शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत काढले. देशाची सुरक्षितता व गतिमान विकास यासाठी नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान व्हावेत, अशी देशातील बहुतांश नागरिकांची भावना आहे. त्याचबरोबर गेल्या दहा वर्षात मी केलेले काम आणि मतदारसंघात सातत्याने ठेवलेला संपर्क यामुळे आपण विक्रमी मताधिक्याने निवडून येऊ, असा विश्वास बारणे यांनी यावेळी व्यक्त केला.

मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रचाराबाबत माहिती देण्यासाठी महायुतीच्या वतीने कासारवाडी येथील कलासागर हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. त्यावेळी माजी खासदार अमर साबळे, आमदार उमा खापरे, अण्णा बनसोडे, अश्विनी जगताप, भाजपच्या शहराध्यक्ष शंकर जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, मावळ मतदार संघ समन्वयक सदाशिव खाडे, रासपचे कार्याध्यक्ष परमेश्वर बुरले, उपाध्यक्ष अजित चौगुले तसेच अमित गोरखे, सुजाता पलांडे, नामदेव ढाके, अनुप मोरे, राजू दुर्गे, नीलेश तरस, मोरेश्वर शेडगे, माऊली थोरात, नारायण बहिरवाडे, राजेश पिल्ले, संजय मंगोडेकर, कुणाल वाव्हळकर आदी प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

गेल्या दहा वर्षांत मतदारसंघात केलेल्या विकास कामांचा आढावा खासदार बारणे यांनी यावेळी सादर केला. पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली. महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून नात्यागोत्याचे राजकारण केले जात असल्याबद्दल पत्रकारांनी छेडले असता बारणे म्हणाले की, या मतदारसंघातील सर्व 25 लाख मतदार हे माझे नातेवाईक व हितचिंतक आहेत.
विरोधी उमेदवाराबद्दल पत्रकारांनी छेडल्या असता बारणे म्हणाले की, मला तर विरोधी उमेदवाराचे नाव देखील माहित नाही. उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच मला विरोधी उमेदवाराचे नाव समजेल.

उमेदवारी अर्ज 22 तारखेला भरणार

आपण 22 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार असून त्यावेळी महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती बारणे यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार तसेच विविध मंत्र्यांच्या मावळ मतदारसंघात सभा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महायुतीकडे स्टार प्रचारकांची मोठी यादी आहे. त्यापैकी निश्चित होतील त्या सभांची वेळोवेळी माहिती देण्यात येईल, असे ते म्हणाले.

हेही वाचा      –    ‘अमोलदादा तब्बल पाच वर्षांनंतर आपले आमच्या गावात स्वागत!’ 

महायुतीच्या कोणत्याही घटक पक्षांमध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी नाही. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, या एकाच भावनेने सर्वजण मेहनत घेत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मावळमधील सहाही आमदार महायुतीचे आहेत. बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था देखील महायुतीच्या ताब्यात आहेत, यापूर्वी शिवसेना, भाजपा, आरपीआय युती होती. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसही सामील झाल्याने ही महायुती झाली आहे. त्यात मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे, याकडेही बारणे यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले.

राज्यात होणार मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती

युवकांच्या बेरोजगारीबद्दल पत्रकारांनी विचारले असता बारणे म्हणाले की, याबाबत भाजपच्या जाहीरनाम्यात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात सव्वातीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याबाबत विविध उद्योगांशी नुकताच करार केला आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल.

पुणे-लोणावळा लोहमार्गाचे चौपदरीकरण, महामेट्रोचा मार्ग विस्तार, रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण, नवी मुंबई येथे होत असलेले नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ, विस्थापितांचे पुनर्वसन, पासपोर्ट सेवा केंद्र, पवना बंद जलवाहिनी योजना, क्रांतिवीर चापेकर बंधूवरील टपाल तिकीट तसेच स्मारकासाठी निधी, संरक्षण खात्याशी संबंधित प्रश्न, रेड झोन, पवना व इंद्रायणी सुधार योजना, अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा प्रश्न, शास्ती कर माफी, नियोजित देहूरोड ते बालेवाडी उड्डाणपूल अशा विविध विषयांबाबत बारणे यांनी यावेळी माहिती दिली.

पार्थ पवार यांनाही प्रचारासाठी निमंत्रण – श्रीरंग बारणे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा बारणे यांनी गेल्या निवडणुकीत पराभव केला होता. या पार्श्वभूमीवर पार्थ पवार आपल्या प्रचाराला येणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. पार्थ पवार यांना आपण स्वतः मावळमध्ये प्रचारासाठी निमंत्रित करणार आहोत. पार्थ यांच्या आई बारामतीतून निवडणूक लढवत असल्यामुळे त्यांच्यावर सध्या मोठी जबाबदारी आहे, असे बारणे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button