‘आंदोलनाच्या नावाखाली समाजाला वेठीस धरता येणार नाही’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

यवतमाळ : विरोधक वेडे झाले आहेत. आपल्या या योजनेमध्ये एवढ्या गतीने कोणी पैसे दिले होते का? विरोधक वारंवार बांगलादेशचं उदाहरण देत आहेत. हा महाराष्ट्र आहे. बांगलादेशसारखी आरजकता माजवायची आहे का? काय तुमचे म्हणणे आहे.या बंदच्या मागून काहीतरी अघटीत या महाराष्ट्रात घडवण्याचे कारस्थान सुरू आहे, असा पुन्हा एकदा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केला आहे.तसेच आज तोंडाला पट्टे बांधून बसले आहेत. लोकशाहीत आंदोलनाला मनाई नाही. पण आंदोलनाच्या नावाखाली समाजाला वेठीस धरता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यवतमाळ येथे आयोजित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ प्रचार व प्रसार कार्यक्रमात ते बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधक म्हणाले लाडक्या बहिणी आणल्या, लाडक्या भावांचे काय? आपण लाडके भाऊही आणले. सुशिक्षित बेरोजगारांना काम देण्याचे काम केले. आता तीन सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.शेवटी हा संसाराचा गाढा कसा चालवायचा, कुटुंब कसे चालवायचे याची चिंता भगिनींना आहे. महिना कसा घालावयाचा. मी गरिबी पाहिली आहे, असे ते म्हणाले.
हेही वाचा – पुण्यात पावसाचा रेड अलर्ट, खडकवासला धरणातून वेगाने पाण्याचा विसर्ग
दुसरीकडे साधूंचे हत्याकांड झाले तेव्हा तोंडावर पट्टी, करोनात बॉडीबॅग भ्रष्ट्राचार, खिचडीत भ्रष्टाचारा झाला तेव्हा तोंडावर पट्टी. तेव्हा कंत्राटदाराबरोबर गट्टी होती. चौकात बसून राजकारण करणाऱ्यांना कधीतरी औकात दाखवल्याशिवाय राहणार नाही.भ्रष्टाचारात ज्यांची तोंड काळे झाले त्यांच्या हातात शोभतात काळे झेंडे. आम्ही फक्त देण्याचे काम केले. आम्ही फक्त या राज्यातील सर्वसामान्य लोकांना काय मिळाले पाहिजे, काय दिले पाहिजे हा निर्णय घेतो, असेही ते म्हणाले.
यवतमाळमध्ये आज शनिवारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर स्थानिक महिलांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.यावेळी सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण केले.
त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. ही दोन्ही भाषणे यावेळी नीट पार पडली. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषणासाठी उभे राहताच प्रेक्षकांमध्ये बसलेल्या काही महिलांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यानंतर महिला पोलिसांकडून त्यांना नियंत्रणात आणले.