Shirur Lok Sabha Election: भोसरीतील गावजत्रा मैदानासाठी महायुती-महाविकास आघाडीत ‘रस्सीखेच’
देवेंद्र फडणवीस यांच्या सभेसाठी महेश लांडगे आग्रही: शरद पवार यांच्या सभेसाठी अमोल कोल्हे यांची मागणी?
![Shirur Lok Sabha Election: 'Rassikhekhe' in Mahayuti-Mahavikas alliance for Gavjatra ground in Bhosari](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/Sharad-Pawar-and-Devendra-Fadanvis-780x470.jpg)
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी वातावरण निर्मिती करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी सर्व ताकद पणाला लावली आहे. सभा-बैठकांसाठी ठिकाण निश्चित करण्यावरुन दोन्ही प्रतिस्पर्ध्यांमध्ये मोठी चूरस निर्माण झाली आहे. भोसरी येथील गावजत्रा मैदानात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. त्याच दिवशी महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या सभेसाठी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे या मैदानावर कुणाची सभा होणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
शिरुर लोकसभा मतदार संघात महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीकडून डॉ. अमोल कोल्हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. या मतदार संघातील भोसरी विधानसभा मतदार संघातून भाजपा आमदार महेश लांडगे यांनी महायुतीची धुरा हातात घेतली असून, या निवडणुकीत १ लाख मतांची आघाडी आढळराव पाटील यांना देण्याचा दावा केला आहे.
राज्यात लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यात नंदुरबार (ST), जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी (SC), बीड या मतदार संघात दि. १३ मे रोजी मतदान होत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या प्रदेश नेतृत्त्वाने या मतदार संघातील प्रचारावर आता भर दिला आहे. तिसऱ्या टप्पयातील मतदान दि. ७ मे रोजी झाल्यानंतर चौथ्या टप्प्यातील मोहीमेसाठी दिग्गजांच्या सभांचे नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी दि. ९ मे रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा नियोजित केली आहे. भोसरीतील गावजत्रा मैदानावर ही सभा होणार असून, या ठिकाणी भाजपा महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. मात्र, महाविकास आघाडीकडून याच दिवशी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सभा घेण्याचे नियोजन आहे. त्यामुळे दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून गावजत्रा मैदानावर सभा घेण्यासाठी प्रशासनाकडे मागणी केली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
भोसरी विधानसभा ‘किंगमेकर’
२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना सुमारे ३७ हजाराहून अधिक मतांचे लीड मिळाले होते. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी यावेळी भोसरीवर लक्ष केंद्रीत केले आहे. तसेच, भाजपा आमदार महेश लांडगे यांनी या निवडणुकीत महायुतीला १ लाख मतांची आघाडी मिळवून देण्याचा निर्धार केला आहे. भाजपा आणि मित्र पक्षांनी निवडणूक प्रचारसाठी कंबर कसली असून, मतदार संघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची ताकदही तुल्यबळ आहे. त्यामुळे महायुतीच्या स्थानिक नेत्यांची एकजूट झाली, तर भोसरी विधानसभा ‘किंगमेकर’ ठरेल, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.