“शिंदे सेना नाही, शिवसेना…”, शंभूराज देसाई ठाकरेंच्या आमदारावर संतापले, सभागृहात काय घडलं?

Shambhuraj Desai On Varun Sardesai : राज्य सरकारचं नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राज्यातील विविध मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवरच आज विधानसभेत लक्षवेधी सुरू असताना शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई हे शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांच्यावर चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. ‘शिंदे सेना नाही तर शिवसेना म्हणायचं’, असं म्हणत शंभूराज देसाई यांनी वरुण सरदेसाई यांना चांगलंच सुनावलं. तसेच वरुण सरदेसाई यांनी देखील शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली.
वरुण सरदेसाई काय म्हणाले?
“अनावधानाने लोकप्रतिनिधीचं नाव ते विसरून गेले. पण भाजपाच्या दोन पदाधिकाऱ्यांचं नाव त्यांच्या लक्षात होतं. शिंदे सेनेच्या वेळी देखील एका पदाधिकाऱ्याचं नाव त्यांच्या लक्षात होतं. अजित पवार यांच्या पक्षाच्या आमदाराच्यावेळीही त्यांच्या लक्षात होतं”, असं सभागृहात वरुण सरदेसाई बोलत होते. मात्र, यावेळी बोलताना वरुण सरदेसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा शिंदे सेना असा उल्लेख केला. पण त्यावर शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी तीव्र आक्षेप घेतला.
हेही वाचा – शेतकऱ्यांना दिलासा मिळणार, प्रत्येक जिल्ह्यात हेक्टरी २३ क्विंटलप्रमाणे कापूस खरेदी होणार…
मंत्री शंभूराज देसाई काय म्हणाले?
“वरुण सरदेसाई हे एकदा नाही तर दोनदा शिंदे सेना म्हणाले आहेत. पण केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा त्यांनी थोडा तपासून पाहावा. निवडणूक आयोगाने घटनेप्रमाणे आणि कायदे तपासून शिवसेना, धनुष्यबाण हे आम्हाला दिलेलं आहे. त्यामुळे आमच्या पक्षाचं नाव शिवसेना आहे, आमच्या पक्षाच्या नावाच्या खाली उबाठा वैगेरे जोडलेलं नाही. त्यामुळे त्यांनी आमच्या पक्षाचा उल्लेख करताना शिवसेना असाच करावा. तसेच वरुण सरदेसाई यांनी सभागृहात शिंदे सेना असा उल्लेख केला आहे, तो उल्लेख कामकाजामधून काढून टाकण्यात यावा”, असं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.
वरुण सरदेसाई यांचा देसाईंना पुन्हा टोला
वरुण सरदेसाई यांनी शिवसेनेचा शिंदे सेना असा उल्लेख केला. त्यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यानंतर पुन्हा वरुण सरदेसाई यांनी देसाईंना टोला लगावला. वरुण सरदेसाई म्हणाले की, “शंभूराज देसाई तुम्ही जे म्हणाला आहात ते अगदी खरं आहे. निवडणूक आयोगाने ते सांगितलं आहे. मात्र, काल एका पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चार वेळा शिंदे सेना म्हणाले आहेत. त्यामुळे तुम्ही एकदा त्यांना देखील सांगा”, असं म्हणत वरुण सरदेसाई यांनी देसाई यांना टोला लगावला.
अनिल पाटील काय म्हणाले?
वरुण सरदेसाई आणि शंभूराज देसाई यांच्यातील या संवादानंतर सभागृहात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते अनिल पाटील यांनी देखील वरुण सरदेसाई यांच्यासह आदी सदस्यांना एक विनंती केली. अनिल पाटील यांनी म्हटलं की, “आमच्याही पक्षला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असं म्हणू नका, फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणा”, असं अनिल पाटील यांनी म्हटलं आहे.




