‘दिलीप वळसे पाटलांना १०० टक्के पराभूत करा’; शरद पवारांचा हल्लाबोल
![Sharad Pawar said to defeat Dilip Walse Patil 100 percent](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/11/Sharad-Pawar-and-Dilip-Walse-Patil-780x470.jpg)
पुणे | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची आंबेगावमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना शरद पवरांनी भर सभेत अजित पवार गटातील नेत्यांवर गद्दार असा उल्लेख करत हल्लाबोल केला. तसेच, या विधानसभेच्या निवडणुकीत दिलीप वळसे पाटलांना १०० टक्के पराभूत करा, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
शरद पवार म्हणाले, की ज्यांना मी मदत केली, शक्ती दिली, ज्यांना अधिकार दिला, ज्यांचा मी सन्मान केला त्यांच्याकडून मला काहीही नको. मात्र, आज त्यांच्यावर मतदारसंघातील लोक नाराज आहेत. त्यांनी (दिलीप वळसे पाटील) आम्हा लोकांचा शब्द पाळला नाही हे लोकांना आवडलेलं नाही. आमची साथ सोडली आणि आता तिकडे मंत्रिमंडळात बसले. आता ते लोकांना सांगतात, ते लोकांना खोटं बोलतात. ते लोकांना काय सांगतात? आमचे आणि शरद पवारांचे संबंध अजूनही चांगले आहेत. मात्र, अशी कोणतीही गोष्ट नाही.
हेही वाचा – राज्य हातात द्या, महाराष्ट्राला गतवैभव दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : शरद पवार
आता ते (दिलीप वळसे पाटील) सांगतात की निवडणुका आल्या आहेत. शरद पवार मतदारसंघात येतील. मात्र, माझ्याबाबत काहीही बोलणार नाहीत. आता त्यांच्याबाबत काय बोलायचं? त्यांनी बोलायला काय ठेवलंय? त्यांनी बोलायला काहीही ठेवलेलं नाही. त्यांनी फक्त एकच गोष्ट केली, ती म्हणजे त्यांनी गद्दारी केली. जो गद्दारी करतो त्या गद्दाराला शिक्षा द्यायची असते. या विधानसभेच्या निवडणुकीत माझा तुम्हाला एकच शब्द आहे. या निवडणुकीत दिलीप वळसे पाटलांना १०० टक्के पराभूत करा, असंही शरद पवार म्हणाले.