‘बारसू रिफायनरीबाबत सरकारने घाई करू नये’; शरद पवार
![Sharad Pawar said that the government should not rush regarding the Barsu refinery](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/Sharad-Pawar-5-780x470.jpg)
मुंबई : रत्नागिरीतल्या राजापूरमधील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीवरून मोठा वाद सुरू आहे. प्रकल्पाच्या माती परिक्षणाला स्थानिक विरोध करत आहेत. हा विरोध पोलीस बळाचा वापर करून मोडून काढत मंगळवारी ड्रिलिंगचे काम सुरू करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यातही घेतले. दरम्यान, याप्रकरणी शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार म्हणाले की, मी उदय सामंत (महाराष्ट्राचे उद्योग मंत्री) यांना बारसू येथे आंदोलकांवर बळाचा वापर केला होता की नाही याबद्दल विचारले. त्यांनी मला सांगितले की सरकारने आंदोलकांवर बळाचा वापर केला नाही. त्यांनी मला असेही सांगितले की सरकार तिथे फक्त माती परीक्षण करत आहे आणि जमिनीचे सर्वेक्षण अद्याप सुरू झालेले नाही. मी त्यांना सांगितले की सरकारने घाई करू नये आणि स्थानिकांशी देखील चर्चा करावी, असं देखील शरद पवार म्हणाले.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली. याभेटीनंतर उदय सामंत म्हणाले की, ही राजकीय बैठक नव्हती. बारसूमधील सध्याची परिस्थिती काय आहे, तिथे काल काय परिस्थिती निर्माण झाली होती त्याची माहिती मी शरद पवारांना दिली.
काल येथे आंदोलक महिलांना अटक केली होती. परंतु त्यांना आता सोडून दिलं आहे. प्रशासन आणि शासनाने शेतकऱ्यांशी बोललं पाहिजे. शासन बोलायला तयार आहे. जिल्हा प्रशासनाने तिथल्या ३०० ते ३५० लोकांसबोत बैठक आयोजित केली आहे. त्यांच्याशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन पुढील हालचाली केल्या जातील, असं उदय सामंत म्हणाले.