४ राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले..
मुंबई : देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा आज निकाल लागतोय. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजप आघाडीवर आहे. तर तेलंगणामध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. अशातच या निवडणुकीच्या निकालांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार म्हणाले, दोन राज्यात भाजपची सत्ता होती. तिथं त्यांनी अधिक लक्ष केंद्रीत केलं होतं. मुख्यत: राजस्थानचा मुद्दा आहे. मागची पाच वर्षे राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळे आता नव्या लोकांना संधी द्यावी, असा मूड राजस्थानच्या जनतेचा दिसतो. त्याला साजेसा असा निकालाचा सुरुवातीचा कल दिसतो आहे.
हेही वाचा – ‘तेलंगणात भाजपने जीवाचं रान केलं, पण..’; काँग्रेस नेत्याचा भाजपाला खोचक टोला
तेलंगणाच्या निकालावर शरद पवार म्हणाले, ज्यांच्या हातात सध्या सत्ता आहे. त्यांच्याकडे आताही सत्ता जाईल, असं वाटत होतं. मात्र राहुल गांधी यांची हैदराबादला एक जाहीर सभा झाली. त्या सभेला लोकांची झालेली गर्दी पाहिल्यानंतर आम्हा लोकांची खात्रा झाली की, इथं परिवर्तन होईल. आता तरी हे सुरुवातीचे कल आहेत. मात्र सध्याकाळी ५-६ नंतर सगळं चित्र स्पष्ट होईल. पण ही गोष्ट मान्य केली पाहिजे की, लोकांना बदल हवा आहे, असंही शरद पवार म्हणाले.