‘डॉ. सायरस पूनावाला यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा’; शरद पवार यांची मागणी
![Sharad Pawar said that Cyrus Poonawala should be given Bharat Ratna award](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Sharad-Pawar-and-Cyrus-Poonawalla-780x470.jpg)
पुणे | पूनावाला यांच्यामुळेच आपला देश कोरोनातून बाहेर पडू शकला. त्यांचे वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान लक्षात घेता राज्यकर्त्यांनी केवळ ‘पद्मभूषण’ पुरस्कारापुरते त्यांना मर्यादित न ठेवता त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान करण्यासाठी केंद्र सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी शरद पवार यांनी केली.
शरद पवार म्हणाले की, डॉ. मोहन धारिया यांनी आपल्या राजकारण आणि समाजकारणाने देशाला वेगळी दिशा दाखवून दिली. राष्ट्र प्रथम ही मोहन धारिया यांचे विचारसरणी होती. सध्या जगातील पाचपैकी तीन व्यक्ती सायरस पूनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली लस घेत आहेत. सीरम इन्स्टिट्यूटचे जागतिक स्तरावरील योगदान आपल्याला लक्षात येऊ शकते, त्यांनी दिलेले हे योगदान लक्षात घेता सायरस पूनावाला यांना देशातील सर्वोच्च ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे.
हेही वाचा – मनोज जरांगे पाटलांचं आंदोलकांना भावनिक आवाहन; म्हणाले,’मी मेलो तर..’
सायरस पूनावाला म्हणाले, डॉ. मोहन धारिया हे जेव्हा देशाच्या नियोजन समितीचे उपाध्यक्ष होते, त्या वेळी आमच्या सीरम इन्स्टिट्यूटच्या वाटचालीमध्ये त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले होते, त्यानंतरही त्यांनी आम्हाला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केले. आज कोट्यवधी लहान मुलांचे जीव आमच्या संस्थेने तयार केलेल्या लसीमुळे वाचत आहेत, ही एकप्रकारे समाधानाची बाब आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सायरस पुनावाला यांचे योगदान हे डॉ. मोहन धारिया यांच्याप्रमाणे राष्ट्र निर्मितीचे आहे, डॉ. मोहन धारिया यांच्या नावाचा पुरस्कार त्यांना देऊन एक प्रकारे या पुरस्काराची उंची वाढली आहे. डॉ. मोहन धारिया यांनी भारतीय राजकारणाला वेगळी उंची निर्माण करून दिली त्याचप्रमाणे डॉक्टर सायरस पुनावाला यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये केलेल्या कामामुळे केवळ देशालाच नव्हे तर जगाला मोठ्या संकटातून दूर केले आहे.