व्होट जिहादवरून शरद पवारांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका; म्हणाले..
![Sharad Pawar said that a certain community in Pune votes for BJP.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/11/Sharad-Pawar-and-Devendra-Fadnavis-780x470.jpg)
Sharad Pawar | लोकसभा निवडणुकीत मुस्लीम समुदायाने महाविकास आघाडीला एकगठ्ठा मतदान केल्यामुळे महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला, असा आरोप महायुतीचे नेते करतात. त्यामुळे यंदा विधानसभा निवडणुकीत व्होट जिहादचा आरोप केला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नोमानी यांचा एक व्हिडीओ पोस्ट करत महाविकास आघाडीवर टीका केली आहे. यावरून शरद पवार यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे.
शरद पवार म्हणाले, की व्होट जिहादचा मुद्दा देवेंद्र फडणवीस यांनी काढला. लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्याक समुदायाने महाविकास आघाडीला मतदान केले. एखाद्या मतदारसंघात विशिष्ट समाजाने एखाद्या पक्षाला मतदान केले तर तो त्यांचा अधिकार आहे. पुण्यामध्ये काही मतदारसंघात एक विशिष्ट समाज भाजपाला मतदान करतो. आम्हाला त्याची सवय झाली आहे. कारण ते नेहमीच तसे मतदान करतात. याचा अर्थ तो काही जिहाद होत नाही. त्यामुळे याला धार्मिक रंग देऊन त्यांची विचारधारा दिसते.
हेही वाचा – ‘गेल्या १५ वर्षांत मतदार संघामध्ये विकास झाला नाही’; डॉ. अर्चना पाटील चाकूरकर
‘व्होट जिहाद’ हा शब्द वापरून देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी एकप्रकारे या निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही याच्या विरोधात आहोत. बटेंगे तो कटेंगे हा विषयदेखील धार्मिक मुद्द्यावरचा आहे. सत्ताधारी जेव्हा हे विषय पुढे करत आहेत. याचा अर्थ आपल्याला यश मिळणार नाही, अशी खात्री त्यांना झाली आहे. त्यामुळेच धार्मिक विषय काढून निवडणूक इतर विषयांवर नेण्याचा प्रयत्न होत आहे, असंही शरद पवार म्हणाले.