सत्यजीत तांबेना मामाची साद मात्र सत्यजीत म्हणताहेत ‘उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी… सूचक ट्विटने चर्चांना उधाण
![Satyajit Tambena Mamachi Saad But Satyajit Says 'Flying birds should not have a desire to return'...Suggestive tweet sparks discussion](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/Satyjeet-Tambe-Balasaheb-Thorat-780x470.jpg)
अहमदनगर: सत्यजीत तांबे यांनी एक चारोळी ट्विट केली आहे. ‘उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी….. घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी’, अशा सूचक असणाऱ्या ओळी सत्यजीत तांबे यांच्या ट्विटमध्ये आहेत. त्यामुळे सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस पक्षात परतण्याचे सर्व दोर कापून टाकले आहेत का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सत्यजीत तांबे यांच्या या ट्विटचे राजकीय वर्तुळात निरनिराळे अर्थ काढले जात आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अपक्ष लढवल्यामुळे काँग्रेसमधून निलंबित झालेले नवनिर्वाचित आमदार सत्यजीत तांबे यांच्या आगामी राजकीय भूमिकेबाबत सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. सत्यजीत तांबे यांचे मामा आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी कालच सत्यजीत तांबे यांना अप्रत्यक्षपणे घरवापसीची साद घातली होती. मात्र, त्याच्या दुसऱ्याच दिवशी सत्यजीत तांबे यांनी एक ट्विट करुन आपण आता माघार घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचे सूचित केले आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीपूर्वी सत्यजीत तांबे हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. नंतरच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही सत्यजीत तांबे यांच्यासाठी फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. त्यामुळे सत्यजीत तांबे काँग्रेस पक्षात राहणार की नवी वाट धुंडाळणार, याविषयी अनेक शक्यता व्यक्त केल्या जात होत्या. परंतु, सत्यजीत तांबे यांचे ट्विट पाहता, ते नव्या राजकीय वाटा धुंडाळण्याच्या मानसिकतेत दिसत आहे. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात स्वत:ची स्वतंत्र ओळख प्रस्थापित करण्याचा सत्यजीत तांबे यांचा इरादाही या ट्विटमधून प्रतित होत आहे. यावर बाळासाहेब थोरात आणि महाविकास आघाडीचे नेते आता काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
बाळासाहेब थोरात नेमकं काय म्हणाले?
बाळासाहेब थोरात यांच्या हाताला दुखापत झाल्यामुळे गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. सोमवारी बाळासाहेब थोरात अनेक दिवसांनी त्यांचा बालेकिल्ला असणाऱ्या संगमनेर तालुक्यात परतले. यावेळी केलेल्या भाषणात बाळासाहेब थोरात यांनी आपले भाचे सत्यजीत यांना एक मोलाचा सल्ला दिला होता. ‘सत्यजीत, तुला काँग्रेसशिवाय आणि काँग्रेसलाही तुझ्या शिवाय करमणार नाही. त्यामुळे तू किती दिवस अपक्ष राहणार, हे आपण ठरवू’,असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले होते.
नाशिक जिल्हा काँग्रेस समिती बरखास्त केल्याने बाळासाहेब थोरात नाराज
काँग्रेस पक्षातील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील यांची एक बैठक झाली होती. या बैठकीत बाळासाहेब थोरात यांनी नाशिक जिल्हा काँग्रेस समिती बरखास्त केल्याविषयी नाराजी बोलून दाखवली. हा निर्णय घेताना नाना पटोले यांनी आपल्याला विश्वासात घेतले नाही, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. यानंतर पाटील यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण आणि अमित देशमुख यांचीही भेट घेतली होती.