‘माझ्या यशाचा एकच बाप आहे आणि तो..’; सत्यजीत तांबेंचं वक्तव्य
![Satyajit Tambe said that my success has only one father and he is my father](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/satyajeet-tambe-780x470.jpg)
सर्वजण माझ्या पाठीशी उभे राहिले याची मला जाणीव आहे
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार आणि काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे हे विजयी झाले. त्यांच्या विजयात अनेक लोकांनी मदत केली असल्याचं बोललं जात आहे. याविषयी स्वत: सत्याजीत तांबे यांनी भाष्य केलं आहे.
सत्यजीत तांबे म्हणाले की, अनेक लोकं येतात आणि सांगतात की आम्ही तुम्हाला मदत केली, आमच्यामुळे तुम्ही निवडून आळा आहात. परंतु माझ्या विजयाचं खरं श्रेय माझ्या वडिलांच्या कामाला आहे. हे मी सभागृहातही मांडलं आहे. इंग्रजीत एक म्हण आहे की, सक्सेस हॅज मेनी फादर्स. यशाला अनेक बाप असतात. प्रत्येकजण म्हणतो की, माझ्यामुळे निवडून आला. मात्र माझ्या यशाला एकच बाप आहे आणि तो माझा बाप आहे.
माझ्या वडीलांनी मागील १४-१५ वर्षात प्रत्येकाशी जे संबंध निर्माण केले त्यामुळे मी निवडून आलो. त्यांनी कधीच कुणाची जात पाहिली नाही किंवा धर्म पाहिला नाही. कुणाचा पक्ष पाहिला नाही. त्यांनी प्रत्येकाशी संबंध ठेवले म्हणून सर्वजण माझ्या पाठीशी उभे राहिले याची मला जाणीव आहे, असं सत्यजीत तांबे म्हणाले.
बापाच्या आणि मुलाच्या कामाची तुलना होण्याचा महाराष्ट्राला आणि भारताला फार मोठा इतिहास आहे, असं सूचक वक्तव्य सत्यजीत तांबे यांनी केलं आहे.