शरद पवारांच्या भगिनी सरोज यांचा भाजपावर गंभीर आरोप; म्हणाल्या..
![Saroj Patil said that BJP wants to topple Supriya Sule](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Saroj-Patil--780x470.jpg)
पुणे | लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तिकीटावर सुप्रिया सुळे या उमेदवार आहेत. तर महायुतीकडून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उभ्या राहणार आहे. यावरून शरद पवार यांच्या भगिनी सरोज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत.
शरद पवार यांच्या भगिनी सरोज पाटील म्हणाल्या की, मी कुटुंबातलीच सदस्य आहे, मी हे तुम्हाला सांगते, भाजपाला सुप्रिया सुळेंना पाडायचं आहे आणि सुनेत्राला निवडून आणायचं आहे. त्यामुळे शरद पवारांचा पराभव होईल असं त्यांना (भाजपा) वाटतं. पण बारातमीत शरद पवारांनी केलेलं काम, लोकांचं त्यांच्यावर असलेलं प्रेम या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
हेही वाचा – ‘..तर मी कधीच राजकारणात आलो नसतो’; नितीन गडकरींनी सांगितली आठवण
अजितने काम केलं आहे, अजित काम करतो पण या सगळ्याचा पाया शरदने घातला. पहिल्यांदा शरद आमदार झाला तेव्हा यशवंतराव चव्हाण घरी आले होते आणि म्हणाले होते शरद ही मतं तुझी नाहीत, ही मतं तुझ्या आई वडिलांची आहेत. तुझ्या आई वडिलांनी सामाजिक पाया घातला आहे. त्यामुळे तू तुझी मतं मिळव. शरदने प्रचंड काम केलं आहे, त्यामुळे तो पडणार नाही, असं सरोज पाटील म्हणाल्या.
सुनेत्रा आणि सुप्रिया दोघीही निर्मळ, सोज्वळ आहे. या दोघींना परस्परविरोधात लढवलं जातं आहे हे दुर्दैव आहे. पण दोघींचा स्वभाव चांगला आहे. पण सुप्रियाचा अभ्यास प्रचंड आहे. सुप्रिया सोन्याचा चमचा जरी तोंडात घेऊन जन्माला आलेली मुलगी.. पण एक इंग्रजी शब्दही तिच्या तोंडी नाही. सुप्रियाने प्रयत्न करुन तिची मराठी भाषा सुधरवली. तिच्यात खूप कणखरपणा आला आहे. तिला मुळीच गर्व नाही. तिच्यामध्ये आणि सुनेत्रात महत्त्वाचा फरक म्हणजे सुप्रिया संसदरत्न आहे. विरोधी पक्षाने तिला हे दिलं आहे. तडफदार भाषणं करण्यासाठी ती प्रसिद्ध आहे. तिची भाषणं मोदीही ऐकत असतात. ती फिरते, गरीबांना मदत करते, शिक्षणसंस्थेत ती काम करते. तेवढा अभ्यास सुनेत्राचा नाही, असंही सरोज पाटील यांनी म्हटलं आहे.