‘राज्यात सध्या तीन घाशीराम कोतवालांचं सरकार’; संजय राऊतांची टीका

मुंबई | शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रात तीन घाशीराम कोतालांचं सरकार आहे, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच महाविकास आघाडीचं सरकार आल्यास लाडकी बहीण योजना आम्ही बंद करणार नसल्याचंही ते म्हणाले.
खासदार संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राला शिवसेनेने तीन मुख्यमंत्री दिले आहेत. आम्हीदेखील महाराष्ट्रावर राज्य केलं आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून अनेक मुख्यमंत्री झाले. तसंच राज्याला एक परंपराही आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांना हे माहीत नसेल, तर राज्याचं महाभारत त्यांनी समजून घेतलं पाहिजे. महाराष्ट्रात ही योजना बंद कर, ती योजना बंद कर हे जे सूडाचं राजकारण आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी सुरु केलं आहे.
हेही वाचा – नाशिक फाटा ते मोशी अंतरावर तीन ‘जक्शन-सब-वे’
आम्ही त्या पद्धतीचे राज्यकर्ते नाही. यांना भीती वाटते आहे की आम्ही हरत आहोत, त्यामुळे देवेंद्र फडणवीस लोकांना धमक्या देत आहेत. बाकी त्यांच्या दोन पार्टनरबाबत मला काही बोलायचं नाही. देवेंद्र फडणवीस कपट करत आहेत पडद्यामागून आणि ते महाराष्ट्र पाहतो आहे. चांगल्या योजना कधीही बंद केल्या जात नाहीत. नरेंद्र मोदींनीही काँग्रेसच्या चांगल्या योजना नावं बदलून चालवल्या आहेत त्यांनीही नवीन काहीही केलं नाही, असं संजय राऊत म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांची झोप उडाली आहे कारण त्यांचं सरकार जाणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गाशा गुंडाळावा. महाराष्ट्र त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही, महाराष्ट्रात जे दळभद्री राजकारण देवेंद्र फडणवीस यांनी सुरु केलं त्याचा अंत जवळ आला आहे. लोकसभेला मोदी आणि शाह यांनी बहुमत गमावलं ते महाराष्ट्रामुळे हे लक्षात घ्या. हा महाराष्ट्र तुम्हाला सत्ता देणार नाही लक्षात ठेवा, असं संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्रात तीन घाशीराम कोतवालांचं राज्य आहे. देवेंद्र फडणवीसांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. पेशव्याचं राज्य ज्या पद्धतीने चाललं होतं तसंच आत्ता फडणवीस बोलत आहेत. अनागोंदी, अराजक सगळं चाललं आहे. लूटमार, अराजक याचाच काळ तेव्हा होता. आत्ताही महाराष्ट्रात तीन घाशीराम कोतवाल आहेत. घाशीराम कोतवालाचा इतिहास काय ते आम्ही लवकरच महाराष्ट्राला सांगू, असंही खासदार संजय राऊत म्हणाले.