‘ते ठाकरे तर मी राऊत, बाळासाहेबांनी घडवलेला’; संजय राऊतांचं राज ठाकरेंना सडेतोड प्रत्युत्तर

मुंबई | संपूर्ण महाराष्ट्राची भाषा घाणेरडी करून टाकणारा एक भिxx संपादक इथे राहतो. त्यांना वाटतं तोंड त्यांनाच दिलंय. आम्ही ठाकरे आहोत. त्यांना वाटतं शिव्या फक्त त्यांनाच येतात. सर्व राजकारण घाणेरडं करून टाकलंय, अशी टीका मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यावर नाव न घेता केली. त्यांच्या या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय राऊत म्हणाले, की जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. जे राज्याची लूट करत आहेत. त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी भाषा हे सुद्धा एक हत्यार आहे. ज्या शत्रूला जी भाषा समजते, त्याला त्या भाषेचा वापर करावा असं आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेलं आहे. शुद्ध तुपातली भाषा कुणासाठी वापराची? महाराष्ट्राच्या शत्रूसाठी? आम्ही चाटूगिरी आणि चमचेगिरी करणारे लोक नाही आहोत. राज ठाकरे काय बोलले, त्यात आम्हाला जायचं नाही. निवडणुका असल्यामुळे ते भाजपाचे स्क्रिप्ट वाचत आहेत. त्यांना स्क्रिप्ट वाचावी लागते. नाहीतर ईडीची वर तलवार आहेच.
हेही वाचा – ‘आपल्याला पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना..’; अमित शाहांकडून फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाचे संकेत
माझं बरचसं आयुष्य बाळासाहेब ठाकरेंबरोबर गेलं आहे. हे राज ठाकरे यानांही माहीत आहे. त्यामुळे कोणत्या वेळेला कोणती भाषा वापरायची, याचे धडे मला राज ठाकरेंकडून घेण्याची आवश्यकता वाटत नाही. ते ठाकरे असतील तर मी राऊत आहे आणि बाळासाहेबांनी घडविलेला राऊत आहे. राज ठाकरे ज्या विभागात भाषण करून गेले. तिथे अंडरवर्ल्डचा वापर करून निवडणुका लढविल्या जात आहेत. भाजपा आणि शिंदेंकडून निवडणुकीत गुंडाचा वापर होत आहे. मुंबई-ठाण्यात अनेक गुन्हेगारांवर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. राज ठाकरेंनी त्यावर बोलावं, असंही संजय राऊत म्हणाले.





