..तर मोदींचं अहंकारी सरकार १५ मिनिटेही टिकू शकणार नाही; संजय राऊतांचं विधान
![Sanjay Raut said that Rashtriya Swayamsevak Sangh can remove Narendra Modi's arrogant government if it decides](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Sanjay-Raut-and-Narendra-Modi-780x470.jpg)
मुंबई | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती. त्यापाठोपाठ आरएसएसचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी भाजपवर टीका केली आहे. ज्या लोकांमध्ये अहंकार भरला होता, त्यांना प्रभू श्रीरामाने २४० जागांवर मर्यादित ठेवलं, असं ते म्हणाले. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, देवाचा न्याय काय असतो ते जनतेने दाखवून दिलं आहे. आम्ही जनतेला जनार्दन म्हणतो, लोक हेच लोकशाहीतले देव आहेत आणि काही लोकांनी देवासमोर चोरी केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ३० हून अधिक जागांवर भाजपा हरली आहे. परंतु, त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांवर जबरदस्ती करून, त्यांना घाबरवून, धमक्या देऊन त्या ३० जागांवर विजय मिळवला आहे. हे प्रकरण आता न्यायालयात जाईल. खरंतर नरेंद्र मोदी, अमित शाह हे हरले आहेत. वाराणसीत मोदी हरले आहेत.
हेही वाचा – मर्सिडिझ बेंझ महाराष्ट्रात ३ हजार कोटींची गुंतवणूक करणार; उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती
संघाला या देशाच्या लोकशाहीची, राजकीय सभ्यतेची, संस्कारांची चिंता असेल तर त्यांनी पडद्यामागे राहून केवळ प्रवचनं न जोडता देशाला दिशा द्यावी. मला खात्री आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ठरवलं तर ते नरेंद्र मोदी यांचं अहंकारी सरकार हटवू शकतात. मोदींचं अहंकारी सरकार १५ मिनिटेही टिकू शकणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.
संघाच्या भूमिका पाहता त्यांना मोदींचं सरकार पाडायचंय असं वाटतं. त्यांना अहंकाराचा पराभव करायचा आहे असं दिसतंय. भाजपाच्या या अहंकारी सरकारला सुरूंग लावण्याचं कामं त्यांची ही मातृसंस्था (RSS) करत असेल तर ते राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत आहेत, असं आम्ही म्हणू, असंही संजय राऊत म्हणाले.