‘..म्हणून अजित पवार गटाला मंत्रिपद नाही’; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा
![Sanjay Raut said that Praful Patel's property worth 150 crores has been cleared](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Ajit-Pawar-2-780x470.jpg)
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा काल (९ जून) पार पडला असून ७१ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. सात खासदार असलेल्या शिंदे गटाला एक राज्यमंत्री पद देण्यात आलंय. तर, एक खासदार असलेल्या अजित पवार गटालाही एक राज्यमंत्री पद देण्यात येत होते. परंतु, त्यांनी ते नाकारले. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी अजित पवार गटावर टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, काल नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली. हे मोदी सरकार नाही किंवा भाजपाचं सरकार नाही. मोदींचं सरकार, मोदी तिसरी बार, मोदी गॅरंटी, सबकूछ मोदी असं काल चित्र नव्हतं. एक कॅबिनेट त्यांनी ओढून ताणून बनवलं आहे. चंद्राबाबू आणि नितीश बाबू या टिपूंचा इतिहास सर्वांना माहितेय. महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं? पियुष गोयल मंत्री झाले. ते स्टॉक एक्स्जेंच वाल्यांचे मंत्री आहेत. अजित पवारांच्या वाट्याला भोपळा आला आहे. दुसरे आहेत नकली शिवसेना. त्यांच्या तोंडावर राज्यमंत्री पद फेकलं आहे. त्यांना मंत्रिपद मिळायचं असतं तर कालच मिळालं असतं. नकली शिवसेनेचे सात खासदार आहेत, यांना त्यांची औकात दाखवली गेली. तुम्ही आमचे आश्रित आहात, असं भाजपाने दाखवून दिलंय.
हेही वाचा – यंदा दगडूशेठ गणेश मंडळ साकारणार जटोली शिवमंदिराची प्रतिकृती!
अजित पवारांच्या बाबतीत आम्हाला असं समजलंय की, दाऊदशी संबंधित असलेली प्रफुल्ल पटेलांची १५० कोटींची प्रॉपर्टी क्लिअर केली. अजून काय पाहिजे? ईडीने जप्त केलेली ही प्रॉपर्टी क्लिअर केली. त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेतले गेले. मग मंत्रिपद कशाला पाहिजे? एकच खासदार निवडून आलेल्या जतिनराम मांजी यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी देण्यात आली, परंतु अजित पवार गटाला मंत्रिपद दिलं नाही, असं संजय राऊत म्हणाले.