‘दिशाच्या कुटुंबावर दबाव असल्याचं वाटतंय’; संजय राऊतांचं वक्तव्य

मुंबई | तब्बल पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चर्चा होऊ लागली आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. यामध्ये दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयच्या माध्यमातून करण्याची मागणी दिशा सालियनच्या वडिलांनी केली आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले, की हे प्रकरण पुन्हा काही लोकांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे. जे प्रकरणच नव्हतं. त्या वडीलांचे जे म्हणणं आहे की त्यांच्यावर दबाव होता. खरंतर त्यांच्यावर आता दबाव आहे. हे प्रकरण तुम्ही नव्याने सुरू करा, असा आता त्यांच्यावर दबाव असावा हे मला स्पष्ट दिसतंय.
ज्यांच्या मुलीचं निधन झालं ते आई-वडील पाच वर्ष गप्प बसत नाहीत अशी माझी भावना आहे. महाराष्ट्रात अशी अनेक प्रकरणे घडली आहेत. कुटुंबिय, आई-वडील हे न्यायासाठी समोर येतात, पोलीस तपासाला सहकार्य करतात. पाच वर्षांनंतर त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्यावर दबाव होता, यावर तुम्ही कसा विश्वास ठेवणार आहात? या माध्यमातून ठाकरे कुटुंबाला आणि आमच्या संपूर्ण शिवसेना परिवाराला बदनाम करण्याचा सातत्याने जो प्रयत्न सुरू आहे तो स्पष्ट दिसतो आहे, असंही संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा : विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान महत्त्वाचे; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
दिशा सालियनचे वडील नेमकं काय म्हणाले?
दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी रिपब्लिक या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यामध्ये ते म्हणाले, एकंदरीत संपूर्ण तपास पाहता मला असं वाटतं की ही हत्याच आहे. कारण एखाद्या व्यक्तीची बॉडी १४ व्या मजल्यावरून पडते, पण तरीही त्या व्यक्तीच्या बॉडीवर एकही जखम दिसून येत नाही. डोक्यावरही कुठे जखम होत नाही, मग असं कसं होऊ शकतं? यावर विचार करायला हवा. १४ व्या मजल्यावरून जर बॉडी पडली तरी ती बॉडी क्लिन कशी राहू शकते? असा सवाल सतीश सालियन यांनी उपस्थित केला.
माझ्यावर कोणाचाही कोणताही दबाव नव्हता. मात्र, मला तशा प्रकारे पटवून सांगण्यात आलं होतं. तसेच दिशा सालियन बरोबर जे होते ते कधीही खोटं बोलणार नाहीत असा विश्वास मला तेव्हा वाटला होता. तसेच तेव्हा आम्हाला पोलिसांनी देखील सांगितलं होतं की ही आत्महत्या आहे. तेव्हा आम्ही पोलिसांवर विश्वास ठेवला होता, असंही सतीश सालियन म्हणाले.