‘गिरीश महाजन भाजपने नेमलेले दलाल’; संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई | ठाकरे गट येत्या काही दिवसांत जमिनदोस्त होणार आहे, येत्या आठ दिवसांत त्यांच्या पक्षाला मोठं खिंडार पडणार आहे, अशी टीका भाजपा नेते गिरीश महाजन यांनी केली. गिरीश महाजन यांच्या या टीकेवर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पक्ष फोडणारे एक दलाल म्हणजे गिरीश महाजन आहेत, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.
गिरीश महाजन म्हणाले, की एकनाथ शिंदे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे अशी अनेक नावं महाराष्ट्रात घेता येतील. हा त्यांचा पक्ष आहे. महाराष्ट्रातील सर्वांत भ्रष्ट, व्यभिचारी, राष्ट्रदोही लोकांना एकत्र करून आज भाजपा दिसतोय. एकेकाळी भाजपा हा पवित्र, हिंदुत्त्ववादी आणि सुसंस्कृत लोकांचा पक्ष होता. या पक्षाचं नेतृत्व मनोहर जोशी, लालकृष्ण आडवाणी, वसंतराव भागवत, भाऊसाहेब फुंडकर अशा लोकांनी केलंय. पण आज या पक्षाची सुत्रे कोणाकडे आहेत? दलाल, भ्रष्ट, ठेकेदारांकडे सुत्र आहेत. आणि हे लोक आमचा पक्ष जमिनदोस्त करायला निघाले आहेत.
हेही वाचा : PCMC | पुनावळेतील ‘त्या’ जागेत कमर्शिअल कॉम्प्लेक्स नको; ऑक्सिजन पार्क हवा!
तुमचा पक्ष जमिनीवर आहे का? तुमचा पक्ष कुठे आहे? हातात पोलीस, पैसे आहेत. टेंडरबाजीतून, खंडणीतून, त्या ताकदीवर पैसे देऊन पक्ष फोडायचे, त्यातील एक दलाल म्हणजे गिरीश महाजन. मला त्यांच्याविषयी काही बोलावं असं वाटत नाही. ज्यादिवशी आमच्याकडे सत्ता असेल त्यादिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना यांच्या चौकशा सुरू झाल्या होत्या. यांच्या आर्थिक घोटाळ्याच्या चौकशा सुरू होत्या, तेच निरोप पाठवत होते की मी राजकारणातून बाहेर पडतो, शांत बसतो. हे डरपोक लोक आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
वेळ प्रत्येकाची येते, आमचीही वेळ येणार. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जमिनदोस्त करण्याची तुम्ही भाषा वापरताय. आणि आमचे काही लोक त्यांच्या बाजूला उभं राहून फोटो काढत होते. गिरीश महाजन हे जे बोलत आहेत ही भाषाच त्यांच्या पक्षाला घेऊन बुडणार आहे. आतापर्यंत अनेकजण पक्षातून बाहेर पडले आणि शिवसेना पक्ष फोडण्याची भाषा केली. अमित शाहांनी तर जंगजंग पछाडलं, त्यांना तर महाराष्ट्र फोडायचा आहे. त्याचे गिरीश महाजन हस्तक आहेत. आमचा पक्ष पवित्र विचारांसाठी निर्माण झालेला पक्ष आहे. शिवसेनेला संपवणं हे कोणालाही जमणार नाही, असंही संजय राऊत म्हणाले.