‘..तर अमित शाह अजित पवारांना मुख्यमंत्री करतील’; संजय राऊत यांचं विधान
![Sanjay Raut said that Amit Shah will make Ajit Pawar the Chief Minister](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/ajit-pawar-and-amit-shah-780x470.jpg)
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी ‘अजित पवार मुख्यमंत्री व्हावं’, अशी इच्छा व्यक्त केली. आशाताई पवार म्हणाल्या, माझं वय आता ८६ वर्षे इतकं आहे, त्यामुळे माझ्या हयातीत माझ्या मुलाने मुख्यमंत्री व्हावं, असं मला वाटतं. दरम्यान, यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले, प्रत्येक आईची अशी इच्छा असते. परंतु, अजित पवार आजपर्यंत जे काही बनले, ते शरद पवारांमुळेच. अजित पवारांच्या आईची ही इच्छा आहे. मी त्यांना नमस्कार करतो. आपला मुलगा पंतप्रधान व्हावा, आपला मुलगा मुख्यमंत्री व्हावा, आपला मुलगा राष्ट्रपती व्हावा, अशी इच्छा प्रत्येक आईची असते.
हेही वाचा – ‘शरद पवारांच्या ‘त्या’ निर्णयामुळे मराठा आरक्षण गेलं’; नामदेवराव जाधव यांचं मोठं विधान
अजित पवार आज जे काही आहेत, ते त्यांना शरद पवारांनीच बनवलं आहे. शरद पवारांनी त्यांना उपमुख्यमंत्री बनवलं. आता मुख्यमंत्री होण्यासाठी ते अमित शाहांकडे गेले असतील तर अमित शाह अजित पवारांना मुख्यमंत्री करतील, असंही संजय राऊत म्हणाले.
आशाताई पवार नेमकं काय म्हणाल्या?
अजित पवार आजारी असून त्यांना अशक्तपणा आला आहे. त्यामुळे ते मतदानासाठी येऊ शकले नाहीत. १९५७ सालापासून मी मतदान करतेय. पूर्वी सुरुवातीला काटेवाडीत काहीच नव्हतं. पण माझ्या सुनेमुळे काटेवाडीत भरपूर बदल झाले. अजित पवारांवर लोकांचं प्रेम आहे. पण पुढचं काय सांगता येतं? सर्वांना वाटतं की दादांनीच मुख्यमंत्री व्हावं. माझं वय आता ८६ वर्षे आहे, त्यामुळे माझ्या डोळ्यादेखतच (माझ्या हयातीत) मुलाने मुख्यमंत्री व्हावं. बारामती आपलीच आहे, लोकांचंही दादांवर प्रेम आहे, आता पाहुयात, असं आशाताई पवार म्हणाल्या.